महायुतीचे ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ सुरुच; उमेदवाराच्या घोषणेला विलंब, कार्यकर्ते संभ्रमात

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे. अर्ज भरण्यासाठी चार दिवस शिल्लक असतानाही अजूनही महायुतीचा उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहेत. उमेदवारच घोषीत झाला नसल्याने प्रचार नेमका कोणाचा करावा, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाल्याने ते संभ्रमात आहेत.

महायुतीत संभ्रमाचे वातावरण असताना महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे प्रचारात उतरलेले दिसत आहेत. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळाली असून येथील उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ महायुतीत शिंदे गटाला देण्यात आल्याची चर्चा आहे. या जागेवर शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आतापर्यंत त्या पाच वेळी या मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मात्र, भाजप त्यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाकडून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचेही नाव समोर येत आहे. मात्र, संजय राठोड खासदारकीची निवडणूक लढाविण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे.

महायुतीत अद्याप उमेदवाराचीच घोषणा झाली नसल्याने स्थानिक पातळीवरील महायुतीच्या कार्यकर्तेमधील संभ्रम वाढत आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघ शिंदे गटाला देण्यात आला असला तरी तो उमेदवारही दिल्लीतूनच ठराविला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारीचा घोळ सुरू असून महायुतीचे ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ सुरुच आहे.