देशांतर्गत क्रिकेटपटूही होणार मालामाल; ‘बीसीसीआय’ लवकरच घेणार मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल खेळाडूंप्रमाणेच आता देशांतर्गत क्रिकेटपटूही मालामाल होणार आहेत. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱया खेळाडूंच्या पगारात मोठी वाढ करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

देशांतर्गत क्रिकेटपटूंचे मानधन आता दुप्पट असावे, असे ‘बीसीसीआय’चे मत आहे. यामध्ये 10 रणजी सामने खेळणाऱया खेळाडूंना बीसीसीआय  75 लाख ते एक कोटी रुपये वार्षिक मानधन देऊ शकते. सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवाच्या आधारे वेतन दिले जाते. 40 पेक्षा जास्त रणजी खेळणाऱया खेळाडूंना बीसीसीआय प्रतिदिन 60 हजार रुपये, 21 ते 40 सामने खेळणाऱयांना 50 हजार रुपये आणि 20 सामने खेळणाऱया खेळाडूंना 40 हजार रुपये मानधन देते. या वेतनश्रेणीवर एखाद्या वरिष्ठ क्रिकेटपटूला त्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास 25 लाख रुपयांपर्यंतची कमाई होते, तर संघातील इतर खेळाडूंना 17 लाख ते 11 लाख रुपये मिळतात.

बाबररिझवानपेक्षाही देशांतर्गत क्रिकेटपटूंची जास्त कमाई

जर आपण नवीन वेतन प्रणालीवर नजर टाकली तर जर देशांतर्गत हिंदुस्थानी क्रिकेटपटू रणजी ट्रॉफीव्यतिरिक्त इतर सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेतात. मग त्याची वार्षिक कमाई कित्येक कोटी रुपये असू शकते. जर आपण पाकिस्तानी संघाचे मुख्य फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांच्याबद्दल बोललो तर ते दोघेही पीसीबीच्या पेंद्रीय करार सूचीच्या ‘अ’ श्रेणीमध्ये येतात. पाकिस्तानमध्ये ‘अ’ श्रेणीतील खेळाडूंना हिंदुस्थानी चलनानुसार दरमहा 13.15 लाख रुपये मिळतात. आता एखाद्या हिंदुस्थानी क्रिकेटपटूने महिनाभरात 2-3 रणजी सामने खेळले तरी तो बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानपेक्षा जास्त कमाई करू शकतो.