आरोग्य – स्त्रियांनो हृदय सांभाळा!

>> डॉ. जी. पी. रत्नपारखी

 वाढत्या शिक्षणामुळे आणि वाढत्या सामाजिक समानतेच्या जाणीवेमुळे आजची स्त्री ही संसाराच्या चार भिंतीत न राहता पुरुषाच्या बरोबरीने आपली सामाजिक कौटुंबिक जबाबदारी पार पाडीत आहे. त्यामुळेच स्त्रियांचे नोकरी करण्याचे, कामधंदा करण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे.

साहजिकच नोकरी धंद्यामधील ताण-तणाव, संघर्ष स्त्राrला सहन करावा लागत आहे. नैसर्गिकरित्या स्त्री ही जास्त संवेदनाक्षम व भावूक असते. तसेच स्त्राrची शारीरिक क्षमतासुदूधा नैसर्गिकरित्या कमी असते. त्यामुळे या ताण-तणावाचे परिणामसुद्धा तिच्यावर अधिक प्रमाणात होतात. तिच्या हळव्या मनावर हे परिणाम खोलवर रुजतात. लहानसहान गोष्टीचेसुद्धा विपरीत परिणाम मनावर होऊन त्याचा हृदयावर परिणाम होतो.

नोकरीच्या दररोजच्या प्रवासातील शारीरिक, मानसिक संघर्ष तिला सहन होतोच असे नाही, शिवाय नोकरीच्या वेळेनंतर घरची जबाबदारीही असतेच. बऱयाच पाहण्यांमध्ये असे आढळून आले की, पुरुषांपेक्षा स्त्रियांची घरात आणि घरातील घटकांशी आणि घटनांशी भावनात्मक गुंतवणूक जास्त असते. त्यामुळे नोकरी करणाऱया स्त्रियांना बाहेरील आणि घरातील समस्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागते. अशा स्त्रियांना अति रक्तदाब आणि हृदयविकाराचे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते.

बैठय़ा कामाची नोकरी असणाऱयांची समस्या ही वेगळीच आहे. सातत्याने बसून काम केल्याने वजन वाढते. विशेषत पोट वाढणे हा प्रकार मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. नोकरी आणि घरच्या जबाबदारीमुळे व्यायाम करायला, Fitness  साठी वेळच मिळत नाही. त्यामुळे वजन वाढणे, पोटाचा घेर वाढणे, मधुमेह होणे, अति रक्तदाबाचा आजार होणे या सर्वांना  निमंत्रण मिळते. त्याला `Metabolic Syndrome’  मेटॉबॉलिक सिंड्रोम असे म्हणतात. आजकालच्या मॉडर्न जमान्यात स्त्रियांमध्येसुद्धा धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. हाय-फाय संस्कृतीच्या पाईक असणाऱया अति मॉड स्त्रिया धूम्रपानाच्या आणि इतर व्यसनाच्या अक्षरश: नादी गेलेल्या असतात. शराब… शबाब… कबाब… दारू… लेट नाईट पार्टीज्, वेळी अवेळी जेवण त्यात असलेल्या तेलकट-तुपकट पदार्थांची रेलचेल, जागरण याचा परिणाम हृदयावर होतो आणि अशा स्त्रियांना हृदयविकार होण्याचे प्रमाण अति असते.

महत्त्वाचे म्हणजे बऱयाच स्त्रिया या गर्भनिरोधक गोळ्या घेत असतात. स्त्रियांची ती एक गरज असली तरी काही वर्षानंतर त्याचे परिणाम दिसून येतात. बऱयाच संशोधनात असे एकंदरीतच आपल्या देशातील स्त्रियांची उंची आणि आकारमान (B.M.I.)  हा पाश्चिमात्य स्त्रियांपेक्षा कमी असतो, त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आकार व व्यास हा खूप कमी असतो. तसेच व्यायाम आणि शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे स्त्रियांच्या हृदयात रक्तवाहिन्यांचे जाळे (Collateral circulation) कमी आढळते, त्यामुळे हृदयविकाराची तीव्रता स्त्रियांमध्ये जास्त जाणवते. अजूनही भारतात स्त्रियांना पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात येते. ही मागासलेली विचारधारा अजुनही बऱयाच ग्रामीण आणि काही शहरी भागात आढळते. त्यामुळे स्त्रियांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करण्याचा घरातील लोकांचा आणि स्त्रियांचा स्वतचा पण कल असतो. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजला हृदयविकाराचे निदान होत नाही… जेव्हा तो बळावतो, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

(लेखक कार्डिओलॉजिस्ट आहेत)