सृजन संवाद – नित नूतन रामायण

>> डॉ. समिरा गुजर जोशी

रामायण हा भारतीय मनाला भुरळ घालणारा असा एकमेवाद्वितीय ग्रंथ आहे. रामकथा माहीत नाही असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. रामायणापासून प्रेरणा घेऊन विविध काव्ये – नाटके निर्माण झाली. आपल्या देशात जितके प्रांत, जितक्या भाषा आहेत त्या सर्वांनी आपापली रामकथासुद्धा गायिली. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या रामकथा निर्माण झाल्या. तरी रामकथा आजही आपल्याला आकर्षित करते. रामकथा असे म्हणत असताना मनात संदर्भ असतो तो मूळ वाल्मीकी रामायणाचा. जसं की मराठी माणसाला संत एकनाथांचे भावार्थ रामायण किंवा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर लिखित व स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेले गीत-रामायण अधिक परिचित असते  तर उत्तर भारतीयाला संत तुलसीदासांचे रामचरितमानस किंवा दक्षिण भारतात कविपावर्ती कंबनाचे कंब रामायण. पण ह्या सगळ्यांची मूळ गंगोत्री म्हणजे आदिकवि महर्षि वाल्मीकी यांनी लिहिलेले रामायण. रामकथेच्या ह्या काळावर मात करणाऱ्या लोकप्रियतेचा जेव्हा विचार येतो तेव्हा ह्या रामायणातच भगवान ब्रह्मदेवांनी महर्षि वाल्मीकींना दिलेला आशीर्वाद सार्थ ठरल्याचे लक्षात येते. रामायण लिहिण्याची आज्ञा करताना त्यांनी आशीर्वाद दिला आहे –

यावत्स्थास्यन्ति गिरय सरितश्च महितले । 

तावद्रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति।  

जोवर या पृथ्वीतलावर पर्वत उभे आहेत, नद्या वाहत आहेत, तोवर रामायणकथा लोकांमध्ये प्रचलित राहील. किती यथार्थ शब्दांत त्यांनी रामायणाचा महिमा सांगितला आहे. रामकथेची लोकप्रियता तर अबाधित राहिली आहेच. पण रामकथा कालसुसंगत राहिली आहे हे विशेष. आजही ती आपल्या जगण्याला दिशादर्शक ठरते हे विशेष. रामकथा आपल्याला अनेक संकल्पनांचे आदर्श मापदंड देतो. आजही भारतीयसंदर्भात सुखाची कल्पना ‘रामराज्य’ अशी असते. कौटुंबिक नातेसंबंध असू देत वा आपल्या मूल्यकल्पना त्याला आकार देण्यात रामायणाचा वाटा असतो. म्हणूनच या सदराच्या माध्यमातून मूळ वाल्मीकी रामायणाच्या आधारे रामकथेतील शक्य होतील तितके टप्पे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

रामायणाला सुरुवात होते ती बालकांडापासून. ह्यामध्ये कथेला सुरुवात होते तीच मुळी महर्षि वाल्मीकींनी भक्तश्रेष्ठ नारद मुनींना केलेल्या एका प्रश्नाने! महर्षि वाल्मीकी म्हणतात, मुनिवर, माझ्या मनात एक कुतूहल आहे की, सध्याच्या काळात मी विचारतो आहे तसा गुणसंपन्न कोणी मानव आहे का? – तसा कोणी असेल तर त्याच्याविषयी जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. कोणत्या प्रकारचा गुणसंपन्न नायक महर्षि वाल्मीकींना अपेक्षित आहे? तर – परामी, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, घेतलेले व्रत सांभाळणारा, सदाचारी, प्रणिमात्रांच्या हिताबाबत जागरूक, विद्वान, समर्थ, ज्याचे दर्शन लोकांना हवेहवेसे वाटते असा, आध्यात्मिक बळ असणारा, राग जिंकला आहे असा, तेजस्वी, असूया न बाळगणारा, युद्धात उतरला तर ज्याच्या रागाची देवांनाही धडकी भरावी असा परामी असणारा नायक. सध्याच्या काळात असा कोणी आहे का? हा प्रश्न त्यांनी नारद मुनींना विचारला आहे. ही गुणांची यादीच अभ्यास करण्यासारखी आहे. आज इतके चरित्रपट अर्थात बायोपिक बनत असतात. (गमतीने बायोपिकचे पीक आले आहे असेही म्हटले जाते) पण चरित्रपटाचा नायक होण्याच्या योग्यतेचे निकष काय असावेत हेच जणू वाल्मीकींनी सांगितले आहे. जर मोजले तर हे सोळा गुण आहेत. पौर्णिमेच्या चंद्रातही 16 कला असतात. भागवतामध्ये भगवान कृष्णाचेही षोडश गुण सांगितले आहेत. थोडक्यात ज्याप्रमाणे चंद्राचा पूर्ण विकास होण्यासाठी 16 कला हव्या, त्याप्रमाणे नराचा नारायण होण्यासाठी हे 16 गुण हवे. नारद मुनी उत्तर देताना म्हणतातदेखील की, हे गुण दुर्मिळ आहेत. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी हे सर्व गुण आढळणे अवघड आहे हे खरेच. ाढाsधाचा उल्लेखच बघा ह्या यादीमध्ये दोनदा येतो. नायक कसा हवा तर ाढाsधावर विजय मिळविलेला, त्यावर नियंत्रण असलेला. पण म्हणजे त्याला राग येत नाही असे नाही. तो विनाकारण किंवा अयोग्यप्रकारे राग प्रकट करत नाही. त्याचा राग प्रकट होतो तो युद्धात. आणि तिथे तो रागावला की देवांनाही धडकी भरते. तो रागीट नाही त्यामुळे त्याच्या जवळ जायला लोक घाबरत नाहीत. उलट तो ‘प्रियदर्शन’ आहे. लोकांना हवाहवासा वाटणारा आहे. रामायण आपल्याला लिडरशीप अर्थात नेतृत्वगुणांविषयी शिकवण देते ती अशी. कोणत्याही महान नेत्याला हे गुण लावून पहा, त्यांच्या ‘नायकत्वाचे’ मर्म तुम्हाला जाणता येईल. अर्थात सगळेच्या सगळे गुण प्रत्येक नायकात नाही सापडणार, कारण असा गुणसंपन्न नायक एकच – प्रभू श्रीराम.

रामकथेतील अशी काही महत्त्वाची, कदाचित थोडी अपरिचित स्थळे बघण्याचा प्रयत्न ह्या सदरातून करूया. रामकथेचे निरूपण हे असे पुन: पुन्हा करण्यात वेगळाच आनंद आहे. प्रत्येक वेळी काही नवे हाती गवसते. ह्याविषयी संत रामदास स्वामींच्या एका दृष्टांताची आठवण होते. ते म्हणतात,

 एकदा जेविता नव्हे समाधान।  प्रतिदिनी अन्न खाणे लागे।

तैसे निरुपण ….

किंवा आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकरांच्या शब्दात सांगायचे तर – “जोवरी हे जग जोवरी भाषण… तोवरी नूतन नित रामायण!”

[email protected]

 (लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)