व्यसनमुक्तीसाठी यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांचा पुढाकर, नशामुक्त पहाट अभियानाला सुरुवात

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली एक किड आहे. व्यसनामुळे व्यक्तीचे आर्थिक आणि शारिरीक नुकसान होतेच शिवाय त्याच्या कुटुंबावरही याचा वाईट परिणाम होत असतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) एका सर्वेक्षणानुसार प्रत्येक 96 मिनिटाला एका हिंदुस्थानी नागरिकाचा दारूमुळे मृत्यू होतो. नशेच्या अंमलाखाली देशात रोज 90 आत्महत्या होतात. 72 टक्के अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात तर 40 टक्के कर्करोग तंबाखू सेवनाने होतो. जवळपास 1 कोटी हिंदुस्थानी अंमली पदर्थांचे सेवन करतात. ही संख्या स्वीडनच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. हे चित्र बदलण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी नशामुक्त पहाट अभियानाला यवतमाळ जिल्ह्यात सुरुवात केली आहे.

जिल्हा पोलीस दल, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 16 तालुक्यात नशामुक्त पहाट हे अभियान राबविण्यात येत आहे. व्यसनाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले असून यात महाविद्यालयातील एकूण 4500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. पालक, पोलिस पाटील, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक अशा 1800 ते 200 नागरिकांनी स्वत:हून यात सहभाग घेतला आहे. यवतमाळ शहरामध्ये सर्व दर्शनीय भागांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणारी पोस्टर्स लावण्यात आलेले आहे. सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू असून नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्यांच्या नजरेस ही पोस्टर्स पडावीत हा या मागचा हेतू आहे. सार्वजनिक मंडळांनाही जनजागृती करणारी पोस्टर्स लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी रिल्स स्पर्धा आयोजित केली आहे. व्यसनाविरोधात जनजागृती करण्यारी रिल्स तयार करून ती @yavatmalpolice या इन्स्टाग्राम हँडलला टॅग करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. उत्कृष्ट रिल्सना स्पोर्ट्स सायकल, स्मार्ट वॉच, क्रिकेट किट, बॅडमिंटन किट, स्पोर्टस बॅग बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.