Virat Kohli – तो 25 पावलं दूर आहे…

 

 >>द्वारकानाथ संझगिरी 

विराट कोहलीने वेस्ट इंडीजमध्ये शांतपणे 29वं शतक पूर्ण केलं.

हे शतक बरसलं नाही, श्रावणाच्या पावसासारखं रिमझिमलं.

पण त्यामागे मला जिद्द, दृढनिश्चय दिसला. एकेकाळी वेस्ट इंडीजमध्ये धावा केवढय़ा महाग होत्या! त्यापेक्षा अलीकडे पाहिलेली महागडी वस्तू म्हणजे टोमॅटो. आता वेस्ट इंडीजमध्ये धावा आणि विकेटस् खूप स्वस्त झाल्या आहेत, पण घरात कुणी आणून देत नाही. खेळपट्टीवर जावं लागतं. उभं राहावं लागतं. आणि या कसोटीची खेळपट्टी अशी होती की, फटकेबाजी सोपी नव्हती. गोलंदाजी वरच्या दर्जाची नसली तरी मुक्तछंदातली फलंदाजी करावी अशी खेळपट्टी नव्हती. विराटच्या गुणवत्तेलासुद्धा कष्ट उपसावे लागणार होते. ते उपसायची त्याची तयारी होती. अर्जुनाला पक्ष्याचा डोळा दिसला तसं त्याला शतक दिसतंय हे कळत होतं. समोरचा संघ ताकदवान नसेल, त्या सामन्याला किंवा मालिकेला वलय नसेल, प्रेक्षक नसतील तर काही मोठय़ा फलंदाजांना मोठय़ा पराक्रमासाठी स्फूर्ती मिळत नाही. काहींना शिकारीला वाघ लागतो, भेकर चालत नाही. कोहलीला शिकार करणं महत्त्वाचं असतं, शिकार नाही.

कोविडच्या आसपास आणि नंतर तो एक मोठा काळ मोठय़ा धावांसाठी धडपडला; पण एकदा त्या चक्रातून बाहेर पडल्यावर ती त्याची जुनी मानसिक ताकद पुन्हा दिसतेय.

सेट झाल्यावर, खेळपट्टी, गोलंदाजीचा अंदाज घेतल्यावर आता शतक ठोकणार असं वाटायचं असे मी पाहिलेले हिंदुस्थानचे फलंदाज म्हणजे, सुनील गावसकर, सचिन, द्रविड आणि विराट.

सुनीलने तीस धावा केल्या की आम्ही फटाक्यांची तयारी करायचो, इतकी शतकाची खात्री होती. तो भिंत होता. त्याला हलवायला भूपंपाची गरज असे. सचिननं सुरुवातीला त्याचे फ्रंटफूट आणि बॅकफूटवरचे ड्राइव्ह मारत सेट झाला की, शतकाकडे मन जाऊन आधीच उभं राही. पण पुढे पुढे त्याच्या टेनिस एल्बो काळात तो नव्वदीत 27 वेळा बाद झाला. नाहीतर काय विक्रम झाला असता! 2000 सालानंतर द्रविडची बॅट इतकी रुंद होत गेली की, तो सेट झाल्यावर त्याच्या नावावर शतक आधीच लिहून टाकावं. विराट तर तंबूतून येताना मला त्याच्या डोळय़ात त्याचं शतक दिसतं. महत्त्वाचं, तो अर्धशतक झाल्यानंतर सेफ खेळतो, पण कुठेही रेंगाळत नाही. नव्वदीत तर नाहीच नाही. आणि शांतपणे
शंभर करण्याचा आत्मविश्वास असल्याचं त्याला पाहताना जाणवतं. तो पाहणाऱयाला अजिबात दबावात ठेवत नाही. त्यात त्याच्या सुदैवाने त्याला तीन फॉरमॅट खेळायला मिळतात. त्यामुळे कायम बॅट हुंगायला मिळते. एखाद् दोन अपयश पटकन पुसता येतात. शेवटी धावा महत्त्वाच्या, फॉरमॅट नाही. सामने एकामागोमाग मिळतात. तो कारकीर्दीच्या भरात आला आणि वन डेचे नियम बदलले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सोडलं तर इतर कसोटी संघ दुय्यम झाले.

आंतरराष्ट्रीय गोलंदाजी कमकुवत झाली, पण त्याचा फायदा सर्वांना मिळाला. तो विराटने का उचलला? कारण कुवत त्याच्याकडेच आहे. इतरांकडे नाही. तो भलताच फिट आहे. प्रचंड मानसिक ताकद आहे, म्हणून 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर तो जगातल्या पहिल्या चार फलंदाजांत आहे. पण शतकांच्या शर्यतीत तो इतरांना मागे टाकून कधीच पुढे गेला आहे. आता त्याचा पक्ष्याचा डोळा हे 101 वं आंतरराष्ट्रीय शतक आहे. तो 25 पावलं दूर आहे.