राज्यभरातील अनेक जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात आणि जाहिरातबाजीत जेवढा खर्च होतो, तेवढाच खर्च कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागतो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला लगावला आहे. गुळाला मुंग्या जशा चिकटून बसतात, तसे काही लोकं सत्तेला चिकटून असतात, अशी टीकाही त्यांनी अजित पवार गटावर केली.
खडसे यांनी जळगाव येथील मुक्ताई या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाच सप्टेंबरला होणार्या जिल्हा दौर्याबाबत माहिती दिली. त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यभरात शिंदे- फडणवीस-पवार सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रम राबवत आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. या कार्यक्रमासाठी जो खर्च केला जात आहे, तेवढ्याच खर्चात राज्यात कृत्रिम पाऊस पाडून दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.
2014 मध्ये आपण महसूलमंत्री असताना राज्यभरात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला होता, तो यशस्वी झाला होता. सद्यःस्थितीत पावसाअभावी अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याचा दोन तृतीयांश भाग हा दुष्काळसदृश आहे. अनेक भागांत उडीद, मूग गेल्यात जमा आहे. पाऊस नसल्यामुळे पिके कशी जगवावीत, असा प्रश्न शेतकर्यांपुढे आहे. सद्यःस्थिती पिके जगवायची असतील, तर कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे, असे सांगत सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याऐवजी कृत्रिम पाऊस पाडावा, असा सल्ला खडसे यांनी दिला आहे.
जिकडे सत्ता असली तिथे स्वाभाविकपणे ओढा असतो. गुळाला मुंग्या चिकटून बसतात, त्याप्रमाणे काही लोक सत्तेला चिकटून बसतात. स्वाभाविक आहे जिथे सत्ता आहे, तिथे जातात. प्रलोभन असते, काही भीती असते आणि अन्य कारणेही असू शकतात. त्यामुळे असे काही लोकं सत्तेकडे जातात. उद्या आमच्या हातात आल्यास गेलेल्यांपैकी 90 टक्के लोक आमच्याकडे परत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.