अदानींमुळे शेतकरीही हैराण; राजू शेट्टी यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात उद्योगपती गौतमी अदानींना मदत करत असून त्याविरुद्ध सुरू केलेल्या लढय़ासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा दावा शेट्टी
यांनी केला.

 राजू शेट्टी आज दुपारी ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचले. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीमुळे राजू शेट्टी पुन्हा महाविकास आघाडीशी युती करणार अशा चर्चांना उधाण आले. पण या भेटीनंतर शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले.

कोल्हापुरातील पाणी पळवू देणार नाही

कोल्हापुरातील वेदगंगा नदीवर पाटगाव येथे असलेल्या धरणातील पाणी सिंधुदुर्ग येथे नेऊन अदानी उद्योग समूह 2100 मेगावॅट विजेची निर्मिती करणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सीमाभागातील शेतीला पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. अदानी समूहाला पाणी देऊन उलटी गंगा वाहवण्याचे काम सुरू आहे. याविरोधात आम्ही लढा सुरू करत असून त्याला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कारण सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी अदीनींविरोधात लढा उभा केला तरच पाणी वाचणार आहे, असेही शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीत जाण्याचा विचार नाही

जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली का, या प्रश्नावर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा आमचा विचार नाही, असे स्पष्ट केले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार असून लोकसभेच्या सहा जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एफआरपीचे तुकडे करणे आणि भूमी अधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करणे अशा महाविकास आघाडी सरकारच्या दोन निर्णयावर आमचा आक्षेप होता म्हणून आम्ही आघाडीबाहेर पडलो असे सांगतानाच याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आघाडीबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारकडून अदानींचा फायदा, शेतकऱ्यांना तोटा

उद्धव ठाकरे यांची भेट राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी घेतली, असे शेट्टी यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या मुद्दय़ावरून अदानींविरुद्ध लढाई सुरू केली आहे. या अदानींचा शेतकऱ्यांनाही त्रास होत आहे. मोदी सरकारने अदानींच्या फायद्यासाठी खाद्यतेलावरील आयात शुल्क पाच टक्के कमी केल्याने गरीब शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही. कारण अदानींनी परदेशातून मोठय़ा प्रमाणात कच्चे तेल आयात केले आहे. सन 2000 मध्ये सोयाबीनचा चार हजार रुपये दर होता आणि आज 24 वर्षांनंतरही तोच दर आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

अदानींचा त्रास केवळ शहरवासीयांनाच नव्हे तर गावातील शेतकऱ्यांनाही होऊ लागला आहे. त्यामुळे शहरातील आणि गावातील लोकांनी एकत्र येऊन याविरोधात लढा दिला पाहिजे यासाठी शिवसेनेची मदत मिळावी याच हेतूने आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, असे राजू शेट्टी म्हणाले.

मोदी सरकारमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

सोयाबीन आणि कर्जमाफीच्या मुद्दय़ावर मराठवाडय़ामध्ये दौरा सुरू करणार असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले. अदानीविरोधात शिवसेनेची जी लढाई आहे तशीच शेतकऱ्यांचीही आहे. कारण मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अडीच टक्क्यांनी वाढल्या आहेत, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.