Nitin Desai Suicide – लालबागच्या राजाचा देखावा ठरला शेवटची कलाकृती

लालबागचा राजाचे यंदाचे 90वे वर्ष असल्याने नितीन देसाई अतिशय उत्साहात होते. तीनच दिवसांपूर्वी रविवारी ते आपल्या टीमसह लालबागचा राजाच्या मंडप उभारणीच्या कामावर लक्ष ठेवून होते. तब्बल 2 तास ते आमच्यासोबत होते. त्या वेळी त्यांच्या चेहऱयावर कुठेही जराही तणाव दिसला नाही. आपल्या राजाचे यंदाचे नव्वदावे वर्षे आहे. तेव्हा जबरदस्त कलाकृती उभी करू हे त्यांचे वाक्य मला अजूनही आठवतेय. असे काही घडू शकते याचा जराही अंदाज नव्हता. त्यांचे असे जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे, अशा शब्दांत लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

यंदा ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्याचा देखावा उभारण्यात येत आहे. ही नितीन देसाई यांची शेवटची कलाकृती ठरली. एकापेक्षा एक कलाकृती 2008पासून लालबागचा राजा मंडळाशी ते जोडले गेले. शीश महल, राम मंदिर, चांद्रयान, पर्यावरणविषयक विषय असे एकापेक्षा एक विषय त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून सादर केले. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला भाविकांचे भरभरून प्रेम मिळाले, असे सुधीर साळवी यांनी सांगितले.

देसाईंची इन्स्टावरची शेवटची पोस्ट
नितीन देसाई यांनी इन्स्टाग्रामवर लालबागच्या राजाच्या मंडप उभारणीचे काम सुरू झाल्याची पोस्ट जुलै महिन्यात केली होती. लालबागचा राजाचे आगमन जवळ आले असून त्याच्या आशीर्वादाने मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करत असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.