मुद्दा – पुरस्काराच्या कोंदणात चित्रबद्ध ‘भोंडला’

>> डॉ. गजानन सीताराम शेपाळ

जगप्रसिद्ध ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे प्रदर्शन नुकतेच कलाकारांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱया आणि जागतिक दृश्य कला विश्वाचा ‘आयकॉन’ म्हणून स्थान निर्माण करणाऱया मुंबईच्या जहांगीर कला दालनामध्ये संपन्न झाले. या प्रदर्शनात अनेक अपेक्षांची ओझी घेऊन वाहणाऱया अनेक दृश्य कलाकारांची कलासृजने प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनात आपल्या कलाकृतीची निवड व्हावी हे स्वप्न उराशी बाळगणारे दृश्य कलाकार पाहायला मिळतात. अथकपणे आपली कलाकृती प्रदर्शनात निवड होईपर्यंत पाठवत असतात. खूपदा अनेकांना ‘पुरस्काराने’ हुलकावणी दिलेली असते.

27 फेब्रुवारी ते 4 मार्चच्या सप्ताहात संपन्न झालेल्या प्रदर्शनाचे हे 132 वे वर्ष. या कला संस्थेने अनेक दृश्य कलाकारांची ओळख कला जगताला करून दिलेली आहे.या वर्षीच्या प्रदर्शनात ‘राजश्री बिर्ला फाऊंडेशन अवॉर्ड’ मिळविणाऱया ‘भोंडला’ या पारंपरिक लोककला प्रकारावर प्रकाश टाकणाऱया एका कलाकृतीने अनेक जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. सहा टप्प्यांच्या या समूह कलाकृतीने ‘भोंडला’ला भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन पारंपरिक कला प्रकाराद्वारे आकारबद्ध केलेले आहे. प्रयोगशील चित्रकर्ती राधिका वाघ-कुसुरकर यांनी साकारलेली ही कलाकृती ‘भारतीय शैली’ प्रकाराच्या मानाच्या समजल्या जाणाऱया ‘राजश्री बिर्ला फाऊंडेशन’च्या पुरस्काराची मानकरी ठरली.

चित्रकर्ती राधिका या विश्वविख्यात सर ज. जी उपयोजित कला महाविद्यालय, मुंबई येथे दृश्य कलाध्यापन करतात. याच कला महाविद्यालयातून त्यांनी उपयोजित कला विभागातील ‘इलस्ट्रेशन’ अर्थात रेखांकन या विशेष विषयातून पदवी शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पुढे पदव्युत्तर पदवी शिक्षणही याच महाविद्यालयातून यशस्वीपणे पूर्ण कले. या पदव्युत्तर कला शिक्षणात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.
भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन पारंपरिकतेचा सन्मानपूर्वक स्वीकार करून अवलंब करणाऱया राधिका यांचा पारंपरिक कलाशैलींवरील अभ्यास म्हणूनच कदाचित त्यांच्या रंगलेपन शैली व तंत्रांवरदेखील व्यक्त होत असावा हे त्यांच्या पुरस्कारप्राप्त ‘भोंडला’ कलाकृतीवरून ध्यानात येते.

‘भोंडला’ हा एक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. अश्विन महिन्यात येणाऱया हस्त नक्षत्रात ‘भोंडला’ या महिलाप्रधान खेळाची सुरुवात होते. या खेळाला ‘हादगा’ असेही दुसरे नाव आहे. अश्विन महिन्यात येणाऱया नवरात्री उत्सवात ‘भोंडला’ खेळला जातो. घटस्थापनेपासून रोजच्या संध्याकाळी अंगणात हा पारंपरिक नृत्यप्रकार खेळला जातो.
‘हादगा’ वा ‘भोंडला’ ही एक प्रातिनिधिक आणि सांकेतिक तद्वतच प्रतीकात्मक पूजा आहे. ही पूजा ‘हत्ती’ या मेघाचे प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली असते. ‘हादगा’ या खेळातील गज म्हणजे हत्ती हे जल तत्त्वाचे प्रतीक आहे. लक्ष्मी व गौरी हे धरणीचे प्रतीक आहे. ‘या या भुलाबाई आमुच्या आळी’ या ओवीतूनच गृहिणी आणि भुलाबाईचे नाते किती जिव्हाळय़ाचे आहे हे ध्यानात येते. येथे भुलाबाई म्हणजे देवी पार्वती आणि भुलोबा म्हणजे शंभू महादेव शंकर यांच्या प्रतिमेची पूजा करून या भुलाबाई, भुलोबाभोवती फेर धरून माहेरवाशिणी आनंद घेतात. या कथांना चित्रात्मक आकारांमध्ये चित्रकर्ती राधिका यांनी बद्ध केले आहे. ‘भोंडला’ या विषयावर डॉ. सरोजिनी बाबर, विजया देसाई, शैला लोहिया, इंदिरा कुलकर्णी, वैजयंती केळकर, सुनंदा वैद्य, मु. शं. देशपांडे, उज्ज्वला सभारंजक यांची पुस्तके प्रकाशित आहेत. मात्र ‘भोंडला’ या पारंपरिक खेळाला दृश्य कला प्रकारात, भारतीय शैलीमध्ये, स्वतःच्या रंगयोजनांमध्ये आकारबद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱया चित्रकर्ती राधिका या कदाचित एकमेव असाव्यात.
उत्कृष्ट, आशयगर्भ आणि आदराने पारंपरिकतेतील आदर्श संकल्पनांना चित्रबद्ध करून आदरभाव व्यक्त करणारा कलाकार मोठा की त्या कलाकृतीला सन्मानित करणारी संस्था मोठी, हा द्वैतभाव संपुष्टात येऊन जेव्हा अद्वैत किंवा एकात्म भावनाच जागृत राहते अशा वेळी खरे तर सन्मान करणाऱया संस्थेचाच दर्जा अधिक उंचीवर जातो. चित्रकर्ती राधिका यांनी प्रथमच ‘सोसायटीला’ त्यांची ती कलाकृती पाठविली होती. पहिल्याच प्रयत्नात एकदम मानाच्या पुरस्कारापर्यंत जरी ‘भेंडला’ची निवड झाली असली तरी राधिका यांचे परिश्रम, पारंपरिकतेवरील अभ्यासपूर्ण उपासना, लोककला प्रकाराला दृश्य कला प्रकारातील भारतीय शैली आणि तंत्रात व्यक्त करण्याचा प्रवास हा दीर्घ आहे. त्यांच्या दीर्घ साधनेचा हा सन्मान आहे.

[email protected]