लातूरमध्ये मोटरसायकल, मोबाईल चोरणार्‍या टोळीला अटक; 6 आरोपी जेरबंद, साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोटरसायकल आणि मोबाईल चोरणार्‍या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकल, एक लॅपटॉप असा एकूण 8 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली असून एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. अक्षय प्रभाकर कणसे (वय 28), समाधान बाळासाहेब जाधव (वय 20), सद्दाम हुसेन शेख (वय 24), राम उर्फ लखन सुधाकर संदीले (वय 24), नामदेव नरहरे (वय 21), आशिष गोविंद पवार (वय 24) यांना अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमधून मोटरसायकल चोरून नेल्याची घटना घडली होती. दाखल झालेल्या तक्रारीवरून कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हे दाखल झाला होता. त्याचप्रमाणे इतर पोलीस ठाण्यातही मोटरसायकल, मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल होते. पथकांना खबऱ्याकडून मोटरसायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे करणार्‍या आरोपींची माहिती मिळाली. मोटरसायकल व मोबाईल चोरी करून ते मोबाईल कमी किंमतीत लोकांना विकणार्‍या आरोपींची टोळी शोधून टोळीतील सदस्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. या पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा अटक करत चोरी केलेला 1 लॅपटॉप, 11 मोटरसायकली व 21 मोबाईल जप्त केले आहेत.

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखीन तीन साथीदारासह लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. तसेच फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलीस ठाणे एमआयडीसी, पोलीस ठाणे शिवाजीनगर, पोलीस ठाणे गांधी चौक, पोलीस ठाणे विवेकानंद, पोलीस ठाणे भादा,तसेच पोलीस ठाणे कळंब जि. धाराशिव येथील 1 गुन्हा असे एकूण 8 मोटरसायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी करीत आहेत.