घातक हत्याराने दरोडा घालणारी गुन्हेगारांची टोळी 2 वर्षांसाठी हद्दपार

नगरमध्ये घातक हत्याराने दरोडा घालून मोठी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा शिर्डीतील टोळीला दणका दिला आहे.

या टोळीचा प्रमुख राजू उर्फ शाक्या, अशोक माळी (रा.गणेशवाडी, शिर्डी ता, राहाता, जि. अहमदनगर) तसेच टोळी सदस्य किरण ज्ञानदेव सदाफुले (रा.श्रीरामनगर, शिर्डी, ता. जि. नगर) यांचा समावेश आहे.आरोपींनी टोळी तयार करून शिर्डी पोलीस स्टेशन राहाता, हरित व आसपासच्या परिसरात घातक हत्यारासह दारोडा टाकणे, चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करणे,घरफोडी चोरी करणे, चोरी करणे असे 5 गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये टोळीची कायमस्वरुपी दहशत राहण्यासाठी सराईतपणे गुन्हे केलेले होते.

या टोळीची दिवसेंदिवस गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून व प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.टोळीच्या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार,साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते.

टोळीचे टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार कारवाई होऊन नगर जिल्हा हद्दीतून तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस स्टेशन यांनी प्राधिकरणाकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची चौकशी करून पोलीस अधीक्षक यांनी टोळी प्रमुख राजू उर्फ शाक्या अशोक माळी (रा. गणेशवाडी शिडी, ता. राहाता, जि. नगर) टोळी सदस्य किरण ज्ञानदेव सदाफुले (रा. श्रीरामनगर शिर्डी, ता. राहाता, जि. नगर) यांना 2 वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्यपार केले आहे.