स्पाईसजेटच्या विमानात तरुणीचा विनयभंग

कोलकाताहून बागडोगराकडे जाणाऱया स्पाईसजेटच्या विमानात 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. शेजारी बसलेल्या कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप पीडितेने केला. मात्र विद्यार्थ्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे सांगत तक्रार न करण्याची विनंती क्रू मेंबर्सनी केली. त्यामुळे तिने लेखी तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे.

पीडितेने संताप व्यक्त करत लेखी तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर बागडोगरा विमानतळावर विद्यार्थ्याने आपली चूक मान्य केली आणि तरुणीची माफीही मागितली. त्यानंतर पीडित तरुणी कोणतीही तक्रार न करता निघून गेली. सकाळी साडेनऊच्या सुमारास विमान टेकऑफ झाल्यानंतर अचानक तिला वाटले की, एक तरुण तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला वाटले की चुकून त्याचा धक्का लागला असेल, पण पुन्हा त्याने आपल्या मांडीला स्पर्श केला, असा आरोप तरुणीने केला. तसेच संतापून तरुणीने त्या तरुणाला चापट मारली. त्यावेळी एक एअर होस्टेस त्या ठिकाणी आली आणि तरुणीला विचारले, त्यावेळी तिने घडला प्रकार तिला सांगितला, परंतु क्रू मेंबर्सनी त्या तरुणीला तक्रार करण्यापासून रोखले.