हापूसचे दर दीड हजाराने उतरले

कोकण हापूसची वाशी बाजार समितीमधील आवक 31 हजार पेटय़ांवर पोहोचली आहे. आवक वाढल्यामुळे पेटीचे दर एक ते दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. दर कमी होण्याला युरोपमधील रखडलेली निर्यात कारणीभूत असल्याचे समजते. लाल समुद्रामध्ये हुती संघटनेच्या हल्ल्यांमुळे समुद्रमार्गे निर्यातीचा भार हवाई वाहतुकीवर वाढल्याने मागणी असूनही युरोप, अमेरिकेला आंबा निर्यात होत नाही. हा माल बाजारातच राहिल्याने दरावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. हापूसचा हंगाम यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू झाला आहे. कोकणातून दिवसाला पाचशेपेक्षा अधिक पेटय़ा वाशी बाजारात पाठवण्यात येत होत्या.

दोन हजारांत पेटी
सुरुवातीला बाजारात पेटीचा दर 6500 रुपयांपर्यंत होता. त्यानंतर परराज्यांतील आंब्याची आवक वाढू लागल्याने किमतीवर परिणाम होऊ लागला. वाशी बाजारावर हापूसचे दर अवलंबून असतात. गेल्या चार दिवसांपासून हापूसच्या पेटीचा दर दोन हजार ते साडेचार हजार रुपये आहे.
निर्यात होणारा माल स्थानिक बाजारात राहिल्यामुळे दर कमी झाल्याचे मुख्य कारण असल्याचे वाशीतील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. वाशीतील हापूसचे दर सुमारे एक ते दीड हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे.
अनेक कंपन्यांनी युरोपसह अमेरिका, आखाती देशांमध्ये मालवाहतुकीसाठी हवाई मार्गाचा अवलंब केला आहे. त्यामुळे हवाई कंपन्यांवर भार वाढला असून हापूसच्या निर्यातीत अडथळा निर्माण झाला आहे.