आजी-माजी कर्णधारांमध्ये अबोला; हार्दिक पंड्या अन् रोहित शर्मा दोन महिन्यांपासून बोललेच नाहीत

मुंबई इंडियन्स संघातील कर्णधार बदलाला जवळपास दोन महिने होत आले आहेत. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 17 व्या हंगामाला केवळ चार दिवस उरले आहेत. या लोकप्रिय स्पर्धेसाठी सर्वच संघांची मोर्चेबांधणी सुरू आहे, मात्र मुंबई इंडियन्सच्या संघात सर्व काही आलबेल दिसत नाहीये. कारण या संघाचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या आणि माजी कर्णधार रोहित शर्मा दोन महिन्यांपासून एकमेकांशी बोललेच नाहीत. स्वतः हार्दिक पंड्यानेच या अबोल्याला दुजोरा दिला आहे.

हार्दिक-रोहित या दोघांमध्ये 63 दिवसांपासून बोलणे झालेले नाही. मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्याने ही माहिती दिली. हार्दिक पंड्या म्हणाला की, ‘रोहित शर्मा दौऱ्यावर होता. त्यामुळे आम्हा दोघांची भेट झालेली नाही. त्याच्याशी बोलण्याची संधीदेखील मिळालेली नाही. ज्या वेळी रोहित शर्मा संघासोबत जोडला जाईल त्या वेळी मी त्याच्याशी बोलणार आहे.’ मात्र, दोघांची भेट झाली नसली तरी मोबाईलवर ते एकमेकांशी बोलू शकत होते, पण तसे घडले नाही. त्यामुळे या आजी-माजी कर्णधारांमध्ये इगो पॉब्लेम तर नाही ना, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

हार्दिकला हवा रोहितचा पाठिंबा
खेळपट्टीबाबत बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, याबाबतीत मला रोहित शर्माची मदत होईल. हार्दिक पंड्या हा टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. हार्दिक म्हणाला की, ‘परिस्थितीत काहीही बदल झालेला नाहीये. रोहित शर्मा मला कोणत्याही वेळी मदत करेल. मला माहिती आहे की त्याचा हात कायम माझ्या खांद्यावर असणार आहे,’ असेही हार्दिकने सांगितले.

चाहत्यांची नाराजी
रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर चाहते नाराज झाले होते. अनेक चाहत्यांनी तर मुंबईला अनफॉलो करण्यास सुरुवात केली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल जिंकली होती. चाहत्यांच्या नाराजीबाबत बोलताना पंड्या म्हणाला, ‘कर्णधार बदलल्यानंतर चाहते नाराज झाले होते. त्यांनी रोष व्यक्त केला होता. मी चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो, मात्र काही गोष्टी या खेळाडूंच्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. त्यामुळे मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करणार आहे.’