वानखेडेवरही पंड्याला ‘ऐकावे’ लागणार, शेरेबाजी रोखण्यासाठी चाहत्यांवर नजर ठेवण्याचे एमसीएला क्रिकेटप्रेमींचे आवाहन

रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून हार्दिक पंडय़ाकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपवल्याचा राग मुंबईकरांच्या मनामध्ये जोरजोरात खदखदतोय. तसेच पंडय़ाने गुजरात टायटन्सचे नेतृत्व सोडल्याचा रागही अहमदाबादवासीयांनी गेल्या आठवडय़ात काढला होता. आता तीच झलक पुन्हा एकदा 1 एप्रिलला वानखेडेवरही दिसण्याची दाट शक्यता आहे. मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावरचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.

गेल्या आठवडय़ात अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंडय़ाविरुद्ध घोषणाबाजी करून चाहत्यांनी आपला राग व्यक्त केला होता. तब्बल 90 हजार चाहत्यांच्या उपस्थितीत पंडय़ाची उडवलेली हुर्यो पाहून क्रिकेटमन हेलावले होते. हिंदुस्थानी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका हिंदुस्थानी क्रिकेटपटूविरुद्ध हिंदुस्थानी चाहत्यांनी शेरेबाजी केली होती. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी या घोषणाबाजीचा आणि चाहत्यांच्या या भावनांचा निषेध केला होता. पंडय़ाविरुद्ध केलेली घोषणाबाजी कुणालाही पटली नव्हती. चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी केले आहे. त्यामुळे जर पंडय़ाविरुद्ध अहमदाबादमध्ये प्रेक्षकांचा राग दिसतो तर तो वानखेडेवरही त्याचे नक्कीच पडसाद उमटणारच.

हिटमॅन रोहित शर्माला कर्णधारपदापासून मुक्त करणे एकाही मुंबईकर चाहत्याला पटलेले नाही. त्यामुळे मुंबईकर चाहत्यांचेही हार्दिक पंडय़ाला ऐकावे लागणार, हे निश्चित आहे. पण चाहत्यांची घोषणा किती खालच्या पातळीवर केली जाईल, याचा कुणालाही अंदाज नाही. या शेरेबाजीमुळे हार्दिकचेही मन दुखावले गेले आहे. त्यामुळे हार्दिक पंडय़ावर शेरेबाजी करू नये म्हणून सामन्यापूर्वी संघव्यवस्थापन आणि रोहित शर्माकडून प्रेक्षकांना आवाहन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रेक्षकांवर असेल नजर

हार्दिक पंडय़ावर खूप घाणेरडी शेरेबाजी केली जात असल्यामुळे ती टाळण्यासाठी घोषणाबाजी करणाऱया प्रेक्षकांवर करडी नजर ठेवावी, असे आवाहन खुद्द क्रिकेट चाहत्यांनीच या बातमीच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन आणि मुंबई क्रिकेट संघटनेकडे केले आहे. पोलीस यंत्रणेसह मैदानात एमसीएने आपल्या स्वंयसेवकांना चाहत्यांवर नजर ठेवण्याची जबाबदारी द्यावी आणि जो अश्लील आणि खालच्या पातळीच्या घोषणा देईल अशा चाहत्यांना थेट मैदानाबाहेर काढावे, अशी विनंती अस्सल क्रिकेटप्रेमींनी एमसीएला केली आहे. एमसीएने आधीच व्यवस्था केली तर हार्दिक पंडय़ाला नको ती शेरेबाजी ऐकावी लागणार नाही. त्यामुळे एमसीए याप्रकरणी कशा पद्धतीची तयारी करते हे महत्त्वाचे आहे.