अखेर कवठे येमाईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, आरोग्य विभाग अलर्टवर

शिरूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात आज येथील 58 वर्षीय व्यक्ती कोरोना जे एन वन या व्हेरियंटचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिरसाट,डॉ.पूर्णिमा दरेकर यांनी केले आहे.

डॉ.शिरसाट यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार. अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीस मागील तीन ते चार दिवसांपासून सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, कणकण थोडासा ताप येणे अशी लक्षणे जाणवत होती. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदरील व्यक्तीवर औषोधोपचार करण्यात येत होते. परंतु चार दिवस उलटून ही त्या व्यक्तीस बरे वाटत नसल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली.त्यात पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने व गावात कोरोनाचा यावर्षीचा हा पहिलाच रुग्ण निघाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला. त्या रुग्णाला डॉ. शिरसाठ व त्यांच्या सहकार्यांनी धीर देत औषोधोपचार केले असून गरज पडल्यास पुढील तपासण्या व उपचार करण्याचे आश्वासन डॉ. शिरसाट यांनी दिले आहे.

शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दामोदर मोरे, ” सध्या शिरूर तालुक्यात कोरोनाचे जेमतेम चार रुग्ण जरी असले तरी सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे व त्यातच थंडीचे ही दिवस असल्याने सर्दी, खोकला, थंडीताप असे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. कोरोना वरील बहुतांशी तपासण्या व औषधे स्थानिक आरोग्य केंद्रात विनामूल्यं उपलब्ध आहेत. असे असले तरी नागरिकांनी ही दक्षता घेताना गर्दीची ठिकाणे टाळावीत, सर्दी,खोकला,थंडीताप जाणवल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात औषोधोपचार घ्यावेत.

“कवठे गावात प्राथमिक तपासणीत कोरोना जेएन वन या व्हेरियंटचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असला तरी त्यावरील योग्य तो औषध साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. नागरिकांनी दक्षता घेताना,वारंवार हात स्वच्छ साबणाने धुवावेत,सॅनिटाझरचा व मास्कचा वापर करावा. गरज पडल्यास अशा सर्दी,खोकला,थंडीताप,डोकेदुखी जाणवणाऱ्या रुगणांनी तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा”