होली कब है… कब है होली…

होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. रंगांच्या दुनियेत न्हाऊन निघायला आबालवृद्ध तयार आहेत. रंग, पिचकाऱयांनी बाजारपेठा सजल्या आहेत. देशाच्या विविध प्रांतांत पारंपरिक पद्धतीने होळी अन् रंगपंचमी साजरी केली जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होलिकादहन होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन मासातील पौर्णिमेला होलिकादहन केले जाते. यंदा पौर्णिमा दोन दिवस आहे. त्यामुळे होलिकादहन नेमके कधी करायचे…कब है होली, असे विचारले जात आहे. 24 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी पौर्णिमा सुरू होऊन 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी पौर्णिमा संपतेय. पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा 24 मार्चला असल्याने यंदा होलिकादहन हे 24 मार्चला केले जाईल, तर रंगपंचमी किंवा धूळवड ही दुसऱया दिवशी 25 मार्चला साजरी होईल.

होलिकादहनाचा शुभ मुहूर्त ः 24 मार्च 2024 च्या रात्री 10 वाजून 27 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 वाजण्याआधीपर्यंतचा कालावधी होलिकादहनासाठी शुभ आहे.

उत्सवाचा वापर निवडणूक प्रचाराकरिता नको

लोकसभा निवडणुका घोषित झाल्या आहेत. आचारसंहिता लागलेय. उत्सवाचा वापर हा निवडणूक प्रचाराकरिता होण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी घेण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नैसर्गिक रंगांना पसंती

पाण्याचा अपव्यय टाळावा म्हणून कमीत कमी पाणी वापरून रंगपंचमी खेळण्याकडे लोकांचा कल दिसत आहे. सुके रंग त्यातही नैसर्गिक/हर्बल रंगांना पसंती दिली जात आहे. रंगामुळे त्वचेला हानी पोहोचू नये म्हणून रसायनमुक्त रंग वापरून खबरदारी घेतली जाते. लहान मुलांसाठी पिचकाऱया मार्पेटमध्ये आल्या आहेत.