ऑनर किलिंगने गोवंडी हादरली; कट रचून केली मुलगी, जावयाची हत्या

गोवंडी येथे ‘ऑनर किलिंग’चा प्रकार समोर आला आहे. मुलीने आपल्या इच्छेविरोधात दुसऱ्याच तरुणाशी लग्न करून संसार थाटल्याचे बापाला खटकले. अखेर बापाने पद्धतशीर कट रचून दोघांना मुंबईत बोलावले आणि पोटच्या 20 वर्षीय मुलीचा गळा घोटून व चेहरा ठेचून तसेच जावयाचा गळा चिरून दोघांनाही कायमचे संपवले. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी बापासह त्याचा मुलगा, एका तरुणाला बेडय़ा ठोकल्या असून अन्य तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

करण चौरसिया (22) आणि गुलनाज (20) असे त्या दोघा मृतकांचे नाव आहे. युपीतल्या आजूबाजूच्या गावात राहणाऱया करण आणि गुलनाज यांचे सूत जुळले आणि त्यांनी गेल्या वर्षी लग्न केले. मग दोघांनी दिल्ली गाठून तेथे आपला संसार थाटला. गुलनाजचा बाप गोरा खान (50) याला हे नाते मान्य नव्हते. इतके दिवस तो शांत राहिला, पण त्याच्या डोक्यात भयंकर विचार घोळत होते. अखेर त्याने मुलगा सलमान (22) तसेच मोहम्मद सैफ खान (18) व अन्य काहींना सोबत घेऊन मुलगी आणि जावयाला कायमचे संपविण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे गोरा खानने मुलीशी संपर्क साधला आणि तिला गोडीगुलाबीने मुंबईत येण्यास भाग पाडले. दोघेही मुंबईत आल्यानंतर विपरीत घडले.

शनिवारी गोवंडीच्या टेलिकॉम फॅक्टरी वसाहतजवळील भुतबावडीत गळा चिरलेल्या अवस्थेत करणचा मृतदेह सापडला. घटनास्थळी पोलिसांना पाकिटात चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत करणचा मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या नंबरवरून पोलिसांनी तपासाची चव्रे फिरवल्यावर धारावीत राहणारा सलमानचा बाप गोरा खान आणि मित्र सैफ यांची नावे पुढे आली. या तिघांना ताब्यात घेतले. मुलगी गुलनाज हिची कारमध्ये गळा आवळून हत्या केली. त्यानंतर एके ठिकाणी तिचा चेहरा दगडाने ठेचला आणि मृतदेह कळंबोली येथे खाडीत फेकल्याचे बाप-लेकाने सांगितले. तसेच टेलिकॉम फॅक्टरीतल्या विहिरीतला मृतदेह गुलनाजचा पती करणचा असून त्याचीही आम्हीच गळा चिरून हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.