मोदी सरकारच्या दुतोंडीपणाचा कळस, कश्मिरी पंडित असलेल्या प्राध्यापिकेला विमानतळावरूनच परत पाठवले

कलम 370 काढून स्वत:च्या पाठीवर कौतुकाची थाप मारून घेणार्‍या मोदी सरकारच्या दुतोंडीपणाने कळस गाठला आहे. कर्नाटकात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या कश्मिरी पंडित प्राध्यापिकेस बंगळुरातून आल्यापावली परत ब्रिटनला पाठवण्यात आले. विशेष म्हणजे हिंदुस्थानात येऊ नये यासाठी त्यांना कोणतीही नोटीस वा सूचना देण्यात आली नव्हती.

कर्नाटक सरकारने 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी ‘संविधान आणि राष्ट्रीय एकता संमेलन’ ठेवले होते. या कार्यक्रमासाठी ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील प्रो. निताशा कौल यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रो. कौल या ब्रिटनहून निघून बंगळुरू येथे पोहोचल्या. बंगळुरू विमानतळावर उतरताच प्रो. कौल यांना विमानतळ अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. कोणतेही कारण न देता त्यांना ब्रिटनला जाणार्‍या विमानात बसवून देण्यात आले.

प्रो. निताशा कौल यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर कर्नाटक सरकारने दिलेले रीतसर निमंत्रण, संमेलनासंबंधी झालेला पत्रव्यवहार शेअर केला आहे. प्रो. कौल यांनी त्यांचा पासपोर्ट तसेच इतर कागदपत्रेही शेअर करून लोकशाही मूल्यांवर बोलण्यासाठी आपल्याला रोखण्यात आले असा स्पष्ट आरोप केला आहे. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे टीकाकार असल्यामुळेच आपल्याला हिंदुस्थानात प्रवेश देण्यात आला नाही, असेही प्रो. कौल यांनी म्हटले आहे.

कोण आहेत प्रो. निताशा कौल…
प्रो. निताशा कौल या ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण’ या विषयाच्या प्रोफेसर आहेत. प्रो. कौल या कश्मिरी पंडित असून कश्मीर विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर त्यांनी कडाडून टीका केली होती.