हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा! फारुख अब्दुल्ला यांची मोदी सरकारवर सडकून टीका

हिंदुस्थानातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ने मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दुसऱया दिवशी सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आम्हाला पाकिस्तानी म्हणू नका, आम्ही या देशाचा एक भाग आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत पेंद्रातील मोदी सरकारने आतापर्यंत किती कश्मिरी पंडितांना परत आणले, असा जळजळीत सवाल करीत जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारच्या दुटप्पीपणावर सडकून टीका केली.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी आज लोकसभेत मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आम्ही राष्ट्राचा एक भाग असून आम्हाला अभिमान आहे. कधीपर्यंत पाकिस्तानी असल्याचा आमच्यावर संशय घेणार? आम्ही देशासोबत उभे आहोत. हिंदूंसाठी आम्ही गोळ्या खाल्ल्या. भारताचे नागरिक असल्याचा आम्हाला गर्व आहे. देशाची जबाबदारी फक्त हिंदूंची नाही. मुस्लीम, शीख, इसाईसह सर्वांची आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका रंगाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. तर ते भारताचे प्रतिनिधित्व करतात. याकडे तुम्ही डोळेझाक करू शकत नाही. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कश्मिरी पंडितांना परत आणण्याचा प्रयत्न केला, हे तुम्हाला आठवते का, असेही ते म्हणाले. सरकार देशाला संकटात टाकत आहे. आमच्याशी शत्रुत्व करू नका.  जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही पाकिस्तानशी युद्ध करा. आम्ही रोखणार नाही, अशा शब्दांत अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला आव्हान दिले.

आम्ही फक्त कश्मिरी तरुणांशी बोलणार – शहा

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपवला आहे.  मोदी सरकार पाकिस्तान, हुर्रियत, जमीयत यांच्याशी चर्चा करणार नाही, परंतु कश्मीर खोऱयातील तरुणांशी नक्की चर्चा करेन, अशी स्पष्टोक्ती पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेत दिली.