वजन 1000 किलो, लांबी 50 फूट; समुद्र मंथनावेळी दोर म्हणून वापरलेल्या ‘वासुकी’ सर्पाचे अवशेष सापडले

देवांनी आणि दानवांनी अमृताच्या प्राप्तीसाठी एकत्र येऊन मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले अशी पौराणिक कथा सांगितली जाते. या पौराणिक कथेतील वासुकी सर्प खरंच अस्तित्वात होता हे आता सिद्ध झाले आहे. गुजरातच्या कच्छ भागामध्ये असणाऱ्या पानाड्रो लिग्नाइट खाणीमध्ये या भल्यामोठ्या सर्पाचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष वासुकी सर्पाच्या कुळातील असून हा जगातील सर्वात मोठा सर्प होता असा दावा करण्यात आला आहे.

आफ्रिकेच्या जंगलांमध्ये आढळणारा अॅनाकोंडा अजगरही वासुकीपुढे छोटा वाटायचा. याच वासुकीच्या मदतीने देव-दानवांनी समुद्रमंथन अर्थात अमृतमंथन केले होते. त्यावेळी समुद्रातून अमृत, विष यासह अनेक वस्तू निघाल्या होता. आता समुद्रमंथनासाठी वापरलेल्या वासुकीच्या कुळातील सर्पाचे 27 अवशेष पानाड्रो लिग्नाइट खाणीत सापडले आहेत. या सर्पाचे शास्त्रीय नाव Vasuki Indicus आहे.

शास्त्रज्ञांनी या संशोधनाबाबत माहिती देताना सांगितले की, खाणीमध्ये भल्यामोठ्या सर्पाचे अवशेष आढळून आले आहेत. अॅनाकोंडा अजगरापेक्षाही वासुकी सर्प मोठा होता. मात्र तो विषारी नसावा. याच्या आकारावरूनच हा वासुकी सर्प असून तो हळूहळू चालत शिकारीला गिळत होता, असे IIT Roorkee चे पॅलेंटियोलॉजिस्ट देबजीत दत्ता यांनी सांगितले. ‘साइंटिफिक रिपोर्ट’ या जर्नलमध्ये याबाबत एक अहवाल छापून आला आहे.

देबजीत दत्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, वासुकी सर्प हा अॅनाकोंडा, अजगराप्रमाणे शिकारीला गिळत होता आणि त्यांना दाबून मारत होता. मात्र जागतिक स्तरावर झालेल्या बदलामुळे हे सर्प नष्ट झाले असावे. या सर्पाची लांबी 36 ते 49 फूट आणि वजन 1000 किलोच्या आसपास असावे.

दरम्यान, वासुकी सर्पला सापांचा राजाही मानले जाते. कोलंबियाच्या एका खाणीमध्ये 2009मध्ये सापडलेल्या तितानोबावा सर्पापेक्षा वासुकी सर्प मोठा होता की नाही याचा अभ्यास सुरू आहे. तितानोबावा सर्प 42 फूट लांब आणि 1100 किलो वजनाचा होता. 5 ते 6 कोटी वर्षांपूर्वी हा सर्प पृथ्वीतलावर अस्तित्वात होता. त्यामुळे गुजरातच्या कच्छ भागात आढळलेल्या वासुकी सर्पाची तुलना तितानोबावासोबत केली जात आहे.

अर्थात वासुकी सर्पाच्या पाठीच्या कण्याचीच हाडं सापडली असून त्याच्या तोंडाकडील भागाची हाडं सापडलेली नाही. तसेच वासुकी सर्प त्यावेळी नक्की काय खात होता हे देखील अद्याप समोर आलेले नाही. या सर्पाच्या आजूबाजूला मगर, कासव आणि व्हेल माशाचेही अवशेष मिळाले आहेत. त्यामुळे हाच वासुकीचा आहार होता का या दृष्टीनेही शोध सुरू आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.