शास्तीमध्ये सवलत; 11 दिवसांत सहा कोटी वसूल

मालमत्ताकरावरील शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिल्याने पालिकेच्या करवसुलीला प्रतिसाद मिळाला आहे. मार्च महिन्यात तब्बल 7.82 कोटींची वसुली झाली आहे. तर, शास्ती माफीनंतर 16 मार्च ते 27 मार्च या 11 दिवसांत 5.78 कोटी वसूल झाले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

करवसुली ठप्प झाल्याने महापालिकेची वीज बिले थकली आहेत. कचरा संकलनाची बिले थकल्याने अनेकवेळा काम बंद पडले होते. त्यामुळे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी फेब्रुवारी महिन्यापासून कारवाईचे आदेश दिले होते. तसेच, 16 मार्चपासून शास्तीमध्ये 75 टक्के सवलत दिली. त्याचा फायदा घेत नागरिकांनी कर भरण्यास प्रतिसाद दिला. 1 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळात 4 कोटींची वसुली झाली. त्यानंतर 16 ते 27 मार्च या काळात 5.78 कोटी वसूल झाले. काल 27 मार्च रोजी एकाच दिवसात 1 कोटीच्या वसुलीची नोंद झाली. त्यामुळे मनपाची वार्षिक वसुली 55.41 कोटींवर पोहचली आहे.