विराट, जडेजा सुस्साट; हिंदुस्थानचे त्रिशतक

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱया कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी दमदार शतकी सलामी दिल्यानंतर हिंदुस्थानचा डाव गडगडला. बिनबाद 139 वरून हिंदुस्थानची 4 बाद 182 अशी झाली होती. मात्र विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी संयमी आणि सुस्साट खेळाचे प्रदर्शन करत हिंदुस्थानच्या डावाला त्रिशतकापार नेले. विराटने आपल्या कसोटीतील 29 वे शतक साजरे केले आणि जडेजासह पाचव्या विकेटसाठी सवाशतकी भागीदारीही केली. विराट आणि जडेजाच्या दमदार खेळाच्या जोरावर हिंदुस्थानने 4 बाद 326 अशी मजल मारली आहे.  

वेस्ट इंडीज विरुद्ध सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवत हिंदुस्थानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱया कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानचे सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा यांनी 139 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात केली. यशस्वीने दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 74 चेंडूत 57 धावांची खेळी केली, तर रोहितने 143 चेंडूंत 80 धावा झोडपल्या. यशस्वी, रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिल 10, अजिंक्य रहाणे 8 धावा करून स्वस्तात तंबूत परतले. शेवटी हिंदुस्थानच्या डावाची 4 बाद 182 अशी अवस्था झाली होती.  

गिल, रहाणे झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी हिंदुस्थानच्या डावाला आकार दिला. 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱया विराटने सामन्यात संथगतीने सुरुवात केली. त्यानंतर त्याने आकर्षक फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दिवसअखेर विराटने 161 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 87 धावांची खेळी केली, तर जडेजाने 84 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने बिनबाद 36 धावा करून विराटला उत्तम साथ दिली. दुसऱया दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा आधी विराटने आपले शतक तर जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. 

शुभमन, अजिंक्यची बॅट शांतच 

यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये तुफान फटकेबाजी करणाऱया शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांची बॅट वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात शांत राहिली. पहिल्या कसोटी सामन्यातदेखील शुभमन, अजिंक्यला चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करता आले नाही. पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन 6, तर अजिंक्य 3 धावा करून बाद झाले होते. दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातदेखील दोघेही फेल गेले. शुभमन 10, तर अजिंक्य 8 धावा करून तंबूत परतले.  

धावफलक ः 

हिंदुस्थान (पहिला डाव) 4 बाद 288 ः यशस्वी जैसवाल 57, रोहित शर्मा 80, विराट कोहली नाबाद 87, रवींद्र जडेजा 36; केमर रोच 13-64-1, शॅनन गॅब्रिएल 12-50-1, जोमेल वॅरिकन 25-55-1, जेसन होल्डर 13-30-1.