IND vs WI – ‘प्रयोग’ अंगाशी आला, दुबळ्या वेस्ट इंडिजने हिंदुस्थानचा दारुण पराभव केला

ब्रिजटाऊनच्या केसिंग्टन ओव्हल मैदानावर दुसऱ्या वन डे लढतीत प्रयोग करणे टीम इंडियाच्या अंगाशी आले. दुबळ्या वेस्ट इंडिजने हिंदुस्थानचा 6 विकेट आणि तब्बल 80 चेंडू राखून दारुण पराभव केला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-1 अशी बरोबरी साधली.

हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 182 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. हे आव्हान विंडीजने 36.4 षटकांमध्ये पूर्ण केले. विंडीजकडून कर्णधार शाई होपने 63 धावांची मॅच विनिंग खेळी केली. तर केसी कार्टी याने 48 आणि कायले मेयर्सने 36 धावांचे योगदान दिले.

पहिला सामना जिंकल्यानंतर आश्वस्त झालेल्या हिंदुस्थानच्या संघाने दुसऱ्या लढतीत कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आराम दिला. हार्दिक पंड्या याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. विंडीजचा कर्णधार शाई होप याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. ईशान किशन आणि शुभमन गिलने हिंदुस्थानला दमदार सुरुवात करून दिली.

किशनने सलग दुसरे अर्धशतक (55) ठोकले, तर गिल 34 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव वगळता (24) एकही फलंदाज 20 धावांचा आकडाही पार करू शकला नाही. विंडीजकडून शेफर्ड आणि मोती यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर जोसेफला दोन आणि कारिया व सिल्सने प्रत्येकी एक बळी घेतला.