मतदानाची टक्केवारी 11 दिवसांनी कशी बदलली? इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून संशय निर्माण झाला आहे. मतदानाच्या दुसऱया दिवशी अंतिम आकडेवारी दिली असताना 11 दिवसांनंतर सुधारित आकडेवारी देण्यात आल्याने त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला असून हाच मुद्दा घेऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.

पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान झाले तर दुसऱया टप्प्यात 26 एप्रिलला मतदान झाले. या दोन्ही टप्प्यांत सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. या दोन्ही टप्प्यांची अंतिम आकडेवारी मतदानाच्या दुसऱया दिवशी देण्यात आली होती. मात्र 30 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने दोन्ही टप्प्यांत सरासरी 66 टक्के मतदान झाल्याची सुधारित आकडेवारी दिली. त्यात थेट 6 टक्क्यांची तफावत होती. त्यातही काही मतदारसंघांत तर हीच तफावत 10 ते 12 टक्क्यांपर्यंत आढळली. त्याबाबत काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी तक्रार करून निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.

टक्केवारी वाढणे संशयास्पद

मतांची टक्केवारी वाढणे ही संशयास्पद बाब आहे. मतदान झाल्यावर आकडा येण्यासाठी थोडा वेळ लागतो, हे आम्हाला माहीत आहे. एक-दीड टक्का मते इकडे तिकडे होऊ शकतात, पण थेट दहा ते बारा टक्क्यांनी मतांची टक्केवारी वाढल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय निर्माण होतो. त्यामुळे मतांच्या टक्केवारीचा हा घोटाळा आहे, त्याबाबत उद्या इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.