‘इंडिया’ने रणशिंग फुंकले! डरो मत! भयमुक्त भारत घडवणार!!

देशातील 28 पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने हुकूमशाहीविरुद्ध मुंबईतून रणशिंग फुंकले. आघाडीची तिसरी बैठक ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये यशस्वीपणे पार पडली. भविष्यातील निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी लवकरच जागा वाटपही ठरवले जाणार असून देशभरात संयुक्त सभांचा झंझावात होणार आहे. ‘डरो मत’ असे आवाहन देशातील जनतेला करतानाच, भयमुक्त भारत घडवणारच, असा निर्धारही बैठकीत करण्यात आला. सर्वानुमते तीन महत्त्वाचे ठराव या वेळी मंजूर करण्यात आले. आघाडीच्या पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये समन्वय राखण्यासाठी 14 सदस्यांची समन्वय समितीही स्थापन करण्यात आली आहे. अहंकारी, भ्रष्टाचारी, हुकूमशाही मोदी सरकारचा पराभव आता अटळ आहे असा विश्वास या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी व्यक्त केला.

‘इंडिया’ आघाडीची तिसरी महत्त्वाकांक्षी बैठक मुंबईत पार पडली. 28 पक्षांचे मातब्बर नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर आघाडीच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने या बैठकीचे संपूर्ण नियोजन केले होते. देशातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱया मुद्दय़ांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. देशातील हुकूमशाही प्रवृत्तींचा पराभव करून सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आणणे यासाठी अॅक्शन प्लॅनही ठरवण्यात आला.

लोकसभेच्या निवडणुका वेळेपूर्वी लागण्याची शक्यता लक्षात घेऊन इंडिया आघाडीने आपला संयुक्त अजेंडा ठरवला आहे. लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये म्हणून भाजपसमोर ‘इंडिया’ आघाडीचा एकच उमेदवार प्रत्येक मतदारसंघात उभा करायचा अशा महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचप्रमाणे निवडणुकीची वाट न पाहता देशाच्या विविध भागांमध्ये आघाडीच्या संयुक्त सभा आयोजित करण्यावरही एकमत झाले.

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाला धडकी भरल्यामुळेच ते आघाडीमध्ये भांडणे सुरू असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. परंतु देशातील जनता सूज्ञ असून येत्या निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे मत बैठकीसाठी आलेल्या नेत्यांनी व्यक्त केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


इंडिया आघाडीला हरवणे आता मुश्कील नही नामुमकीन है असे सांगतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. इंडियाच्या आजच्या बैठकीत 14 सदस्यीय समन्वय समितीबरोबरच प्रचार (पॅम्पेन) समिती, समाजमाध्यम (सोशल मीडिया) समिती, प्रसारमाध्यम (मीडिया) समिती, संशोधन (रिसर्च) समिती अशा चार समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत, असे राऊत यांनी सांगितले. या चारही समित्यांमध्ये आघाडीतील पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले. तीन महत्त्वाचे राजकीय ठरावही मंजूर झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. आघाडीच्या निवडणूक प्रचार समितीमध्ये विविध पक्षांच्या एकूण 19 नेत्यांचा, मीडिया समितीत 19, सोशल मीडिया समितीत 12 तर संशोधन समितीत 11 नेत्यांचा समावेश असणार असल्याची माहिती देण्यात आली.

दबावाखालील मीडियाला ‘स्वतंत्र’ करणार

मोदी सरकारने मीडियाच्या तोंडाला कुलूप लावले असून हात बांधून ठेवले आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. मीडियावरील सरकारच्या दबावाचा उल्लेख जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही यावेळी केला. मोदी सरकारने कमी काम केले तरी त्यांचे छापले जाते आणि आम्ही जनतेसाठी खपतोय तरी आमचे छापले जात नाही. मोदी सरकारचाच त्यासाठी मीडियावर दबाव आहे. इंडिया आघाडी या दबावातून मीडियाला मुक्ती देईल, मीडिया स्वतंत्र होईल आणि मग तुम्ही तुम्हाला जे दिसेल ते मुक्तपणे लिहा, असे नितीश कुमार म्हणाले. ‘इंडिया’ आघाडी मीडियाला मोदी सरकारच्या जोखडातून मुक्त करेल, असे काँगेस नेते राहुल गांधीही यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले राजकीय ठराव

1 इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाच्या प्रक्रियेसाठी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

2 इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱया महत्त्वाच्या मुद्दय़ांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संयुक्त जाहीर सभा घेणार आहेत.

3 इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱया महत्त्वाच्या मुद्दय़ांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संयुक्त जाहीर सभा घेणार आहेत. ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’ या थीमखाली इंडिया आघाडीमधील पक्ष समन्वयाने देशभरात विविध भाषांमधून इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील.

समन्वय राखता यावा यासाठी पुढीलप्रमाणे 14 जणांची समन्वय समिती बनवण्यात आली.

  1. के. सी. वेणुगोपाल – काँग्रेस
  2. शरद पवार – राष्ट्रवादी काँग्रेस
  3. हेमंत सोरेन – झामुमो
  4. संजय राऊत – शिवसेना
  5. तेजस्वी यादव – राजद
  6. अभिषेक बॅनर्जी – तृणमूल
  7. राघव चढ्ढा – आप
  8. जावेद अली खान – सपा
  9. लल्लन सिंह – जदयू
  10. डी. राजा – भाकप
  11. ओमर अब्दुल्ला – एनसी
  12. मेहबुबा मुफ्ती – पीडीपी
  13. टी. आर. बालू – द्रमुक
  14. सीपीआय (नाव ठरायचेय)