देशात कोरोना संकट गडद! कोरोनाग्रस्तांचा आकडा 3,000 च्या जवळ; बिहारमध्ये आढळले रुग्ण

शुक्रवारी हिंदुस्थानातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3,000 च्या जवळ पोहोचला आहे. तर केरळमध्ये नवा व्हेरिएंट JN.1 ची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती मिळते आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सक्रिय रुग्णांची आदल्या दिवशीची 2,669 संख्या आता 2,997 वर पोहोचली आहेत. केरळमधील एका व्यक्तीचा विषाणूमुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5,33,328 वर पोहोचली आहे. यामुळे मृत्यू दर 1.18 टक्के नोंदवला गेला.

10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातही सक्रिय रुग्णसंख्या वाढली आहेत. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पुडुचेरी या राज्यात कोरोना रुग्ण वाढ होत आहे असं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारी दर्शवते.

कोरोनातून तब्बल 4,44,70,887 बरे झाले आहेत तर बरं होण्याचा राष्ट्रीय दर 98.81 टक्के आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आतापर्यंत, कोविड लसीचे 220.67 कोटी (220,67,79,081) डोस देण्यात आले आहेत.

केरळमध्ये, जेथे JN.1 प्रथम आढळून आला होता, तेथे गेल्या 24 तासांत आणखी 265 प्रकरणे समोर आल्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 2,606 वर पोहोचली आहे. बुधवारपर्यंत देशभरात JN.1 प्रकाराची 21 प्रकरणे आढळून आली आहेत.

गुरुवारी, हिंदुस्थानात 594 नवीन कोविड -19 संसर्गाची नोंद झाली, तर सक्रिय रुग्णांची संख्या आदल्या दिवशी 2,311 वरून 2,669 झाली, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. केरळमधील तीन, कर्नाटकातील दोन आणि पंजाबमधील एक अशा सहा जणांचा विषाणूजन्य आजारामुळे मृत्यू झाला.

बिहारमधील पाटणा येथील दोन जणांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (IGIMS) पाटणा येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला, तर बिहटा येथील ESIC हॉस्पिटलमध्ये दुसर्‍याला विषाणूचे निदान झाले.

दोन व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, राज्याच्या आरोग्य विभागानं सांगितलं की, दोन्ही रुग्णांचा प्रवासाचा इतिहास आढळून आला आहे.

पहिला रुग्ण पाटणा येथील गार्डनीबाग येथील 29 वर्षीय रहिवासी आहे, तर दुसरा रुग्ण बांका जिल्ह्यातील रहिवासी आहे.

जीनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर, रुग्णांना JN.1 चे निदान झाले आहे की नाही हे कळेल.