केरळमध्ये कोरोनाचा विस्फोट, 425 रुग्णांची नोंद, 7 बाधितांचा मृत्यू

आतापर्यंत कोरोनाच्या सर्व लाटांमध्ये केरळमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्याचे पहायला मिळाले आहे. कोरोनाचा उपप्रकार जेएन 1 या विषाणूने हिंदुस्थानात प्रवेश केल्यानंतर आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली. देशातील रुग्णसंख्येत एकट्या केरळची रुग्णसंख्या 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात 24 तासांत 656 नवे रुग्ण आढळले असून यामध्ये केरळातील 425 बाधितांचा समावेश आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूचे थैमान सुरू झाले असून 4 दिवसांत 7 बाधितांचा मृत्यू केरळमध्ये झाला. केरळ वाढीमागे सक्रिय रुग्ण जबाबदार असून, त्यांची संख्या वाढली तर नवीन बाधित वाढण्याचा धोका आहे. हिंदुस्थानात सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 742 वर पोहोचली आहे. 24 तासांत 333 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. केरळमध्ये 296 लोक बरे झाले आहेत. केरळनंतर कर्नाटकात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. 24 तासांत येथे 104 नवीन रुग्ण आढळले असून, 8 लोक बरे झाले आहेत. कर्नाटकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 271 वर पोहोचली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी नोव्हेंबरपासून राज्यात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 52 टक्के वाढ झाली आहे.

चाचण्या वाढण्याचे केंद्राचे आदेश
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर कोरोना चाचण्या, लसीकरण आणि कोविड सेंटरर्स बंद केले गेले. मात्र, आता पुन्हा एकदा चाचण्या सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणा कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज झाल्या आहेत.