Air India च्या विमानाला IndiGo च्या विमानाची धडक; DGCA ने दिले चौकशीचे आदेश

पश्चिम बंगालच्या कोलकाता विमानतळावर मोठी घटना घडली. कोलकाता विमानतळावर बुधवारी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने एअर इंडियाच्या विमानाला धडक दिली. या घटनेत दोन्ही विमानांच्या पंखांचे मोठे नुकसान झाले आहे.

इंडिगो एअरलाइन्सचे विमान टॅक्सीवेवरून जात असताना ते एअर इंडियाच्या विमानाला धडकले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने म्हणजेच DGCA ने या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई केली आहे. चौकशीचे आदेश दिले आहे.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला या प्रकरणी माहिती दिली. ”कोलकाताच्या विमानतळाच्या धावपट्टीवरून आमचे एक विमान तामिळनाडूतील चेन्नईला जाण्यासाठी क्लिअरेन्सची वाट पाहत होते. त्याचवेळी इंडिगो एअरलाइन्स कंपनीचे विमान तिथून जात असताना दोन विमानांच्या पंखांची एकमेकांना धडक लागली. यावेळी चेन्नईला जाण्याऱ्या विमानाचा पंखा तुटला तर दरभंगाला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा पंख निखळला. त्यानंतर विमान तपासणीसाठी पुन्हा बे मध्ये पाठवण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे प्रवाशांची असुविधा झाली, याबद्दल आम्हाला खेद आहे.”

डीजीसीएने अपघातानंतर इंडिगो एअरलाइन्सच्या पायलट्सवर कारवाई केली आहे. विमान कंपनीच्या या पायलट्सना रोस्टरवरून (विमान उड्डाणाच्या कामावरून ) हटविण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर विमानांचे फोटोही समोर आले आहेत. यात एका विमानाचे नुकसान झालेले दिसत आहे आणि दुसऱ्या विमानाचा एक भाग तुटलेला दिसत आहे.

विमानतळाच्या धावपट्टीवर अशी दुर्घटना होण्याची ही पहिली वेळ नाही. वर्षभरापूर्वी अशा प्रकारच्या चार घटना 7 मार्च 2024, 17 नोव्हेंबर 2023, 15 जून 2023 आणि 11 जून 2023 इंडिगो एअरलाइन्सच्या विमानासोबत घडल्या आहेत.