आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराचे सिंडिकेट गजाआड, भिवंडी-निजामपूर पालिकेचा कर्मचारी ड्रगच्या धंद्यात

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा कारवाई करून आंतरराष्ट्रीय, आंतरराज्य ड्रग तस्करांच्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीने कारवाई करून 1.840 किलो अल्प्राझोलम, सीबीसीएसच्या 850 बाटल्या जप्त करून चौघांना अटक केली. जप्त केलेल्या ड्रगची किंमत सुमारे 1 कोटी रुपये इतकी आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रफिकिंग सिंडिकेटवर एनसीबीच्या पथकाने लक्ष ठेवले. हिंदुस्थानातून अमेरिकेत औषधे जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. तस्कर हे विविध मोडसचा वापर करून औषधाची तस्करी करत होते. सप्टेंबर महिन्यात मुंबईतील एका कुरिअरमधून औषधे ही अमेरिकेत जात असल्याची माहिती मिळाली. एनसीबीच्या अधिकाऱयाने कुरिअर ऑफिसमध्ये धाव घेऊन ते पार्सल उघडले. त्या पार्सलमध्ये चहाच्या पानाच्या खाली अल्प्राझोलम टॅब्लेटच्या अनेक पट्टय़ा होत्या. एनसीबीने एकूण 15 हजार अल्प्राझोलम गोळय़ा जप्त केल्या. ते पार्सल हे लखनौ येथील एकाने पाठवल्याचे उघड झाले. त्यानंतर एनसीबीचे पथक लखनौ येथे गेले. तेथे एनसीबीच्या पथकाने फिल्डिंग लावली. एनसीबीने समर एस. नावाच्या एकाला ताब्यात घेतले. तो ड्रग परदेशातील सिंडिकेटकडे पाठवत असायचा.

दुसरे ऑपरेशन एनसीबीने सप्टेंबरमध्ये केले. खोकल्याचे सिरप हे नशेसाठी वापरले जात असून त्याची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. एनसीबीला रवीश एनए नावाच्या व्यक्तीची माहिती मिळाली. तो नियमितपणे औषध खरेदी करत होता. त्याला गुजरात येथील एक जण औषधाचा साठा पुरवणार असल्याची माहिती मिळाली. ती औषधे गुजरात येथून भिवंडीमार्गे मुंबईत आणली जाणार होती. एनसीबीने भिवंडी परिसरात छापा टाकून रवीश आणि आकाश नावाच्या एकाला एनसीबीने ताब्यात घेतले. रवीश हा भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून काम करतो. झटपट पैशासाठी तो ड्रगच्या सिंडिकेटमध्ये आला. रवीश हा भिवंडी येथून ड्रग तस्कराचे सर्किट पुन्हा नव्याने सुरु करू पाहत असल्याचे तपासात समोर आले आहे.

तिसरे ऑपरेशन हे एनसीबीने आज डोंगरी येथे केले. गुजरात येथील एक जण खोकल्याची औषधे ही मुंबईतील तस्करांना देत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. एनसीबीने डोंगरी येथील एका ट्रान्सपोर्टरची माहिती काढली. आज एक जण ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात आला. त्याला एनसीबीने ताब्यात घेतले. त्या माहितीनंतर एनसीबीने रियाझ बी नावाच्या एकाची चौकशी केली. चौकशीत त्याने ड्रग तस्करीत सहभागी असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एनसीबीने 1199 सीबीसीएसच्या बाटल्या आणि दारू जप्त केली. रियाझ हा गेल्या आठ वर्षांपासून या ड्रगच्या धंद्यात आहे. तो ड्रग प्रकरणातील मोठे किंगपिन याच्या संपर्कात होता. त्याच्या इतर साथीदारांचा एनसीबी शोध घेत आहे.