रशियात पुन्हा पुतिनच; 88 टक्के मते मिळवत जिंकली राष्ट्रपतीपदाची निवडणूक

तब्बव 25 वर्षांपासून रशियात सरकार चालवणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांच्या बाजूने पुन्हा एकदा जनतेने कौल दिला आहे. सलग पाचवेळा पुतिन यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. बोरिस येल्तसिन यांनी प्रकृती अस्वास्थामुळे 1999 मध्ये पुतिन यांच्याकडे सत्तेची सूत्रे दिली होती. तेव्हापासून पुतिन एकही निवडणूक हरलेले नाहीत. आता पुन्हा रशियात पुतिनराज आले आहे. त्यांनी 87.97 टक्के मे मिळवत राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे.

रशियात रविवारी मतमोजणी झाली. त्यात पुतिन यांनी 87.97 टक्के मते मिळवत विजय संपादन केला. पुतिन यांचे विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. तसेच त्यांचे इतर विरोधक तुरुंगात आहेत. रशियात राष्ट्रपतीपदासाठी पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्धी होते. त्यांच्यावर पुतिन यांनी मात केली आहे. पुतिन यांच्या विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शने केली होती. अंतर्गत विरोध असूनही या निवडणुकीत पुतिन यांचा विजय झाला आहे.

आता पुतिन यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याने त्यांचा पुढील सहा वर्षांचा कार्यकाळ हा निश्चित झाला आहे. पुतिन यांनी दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा जोसेफ स्टॅलिन यांचा रेकॉर्ड मोडला आहे. रशियाच्या इतिहासात मागच्या दोनशे वर्षात दीर्घकाळ राष्ट्रपती राहण्याचा रेकॉर्ड हा पुतिन यांच्या नावे झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 80 लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदान केले.ही निवडणूक झाली निष्पक्षपाती आणि स्वतंत्र नव्हती असा आरोप अमेरिकेने केला आहे.