मुंबईसाठी अस्तित्वाची लढाई

मुंबई इंडियन्सच्या चेहऱयावर मंगळवारी लखनऊत विजयाचे हास्य यायलाच हवे. जर मुंबईला लखनऊविरुद्धही पराभव पत्करावा लागला तर प्ले ऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळेल. त्यामुळे लखनऊविरुद्धचा सामना मुंबईसाठी अस्तित्वाची लढाईच असेल. लखनऊ विजयी ठरला तर ते प्ले ऑफच्या अगदी जवळ पोहोचतील.

पंजाबविरुद्ध विजय नोंदवल्यानंतर मुंबईत चैतन्य संचारेल, अशी साऱयानाच अपेक्षा होती, पण हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली मुंबईची पराभवाची मालिका कायमच आहे. पंजाबविरुद्ध विजयानंतर राजस्थानकडून सहन करावा लागलेला दारुण पराभव मुंबईच्या वर्मी लागला आहे. त्यामुळे दिल्लीत विजयाची संधी असूनही ते संधीचे विजयात रूपांतर करू शकले नाहीत. आता मुंबईची अवस्था बंगळुरूसारखी झाली आहे. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली मुंबईची अक्षरशः वाताहत झाली आहे. याचा फटका मुंबईसह पंडयालाही बसण्याची शक्यता आहे. उद्या लखनऊविरुद्धची लढत मुंबईसाठी जिंकू किंवा मरू असल्यामुळे संघात फार मोठे बदल करण्याचे धाडस दाखवणार नाही. टी-20 वर्ल्ड कपचा संघ कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. त्यामुळे हार्दिक पंडय़ा आणि तिलक वर्माला जोरदार फलंदाजी करून निवड समितीचे लक्ष वेधता येऊ शकते.

दुसरीकडे लखनऊचा कर्णधार केएल राहुललाही दुसरा यष्टिरक्षक म्हणून हिंदुस्थानी संघात स्थान मिळवायचे असेल तर एक फटकेबाज खेळी करावी लागेल. या तिघांव्यतिरिक्त अन्य कुणाला फारसा फरक पडणार नाही. मात्र लखनऊ विजय मिळवून प्ले ऑफच्या लढतीत चुरस आणखी तीव्र करील.