गाझामध्ये रक्तपात सुरुच, इस्त्रायलच्या गोळीबारात 100 लोकांचा मृत्यू झाल्याचा पॅलेस्टाईनचा दावा

इस्रायली सैनिक आणि हमास दहशतवाद्यांमध्ये संघर्ष टोकाला गेला असून दोन्ही देशात युद्ध पेटलं आहे.इस्रायली सैनिकांकडून गाझापट्टीत सातत्याने हल्ले सुरू आहेत. अन्न घेण्यासाठी येथे जमलेला जमाव इस्रायली गोळीबारात 104 पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा गाझा अधिकाऱ्यांनी केला आहे. तर इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने गुरुवारी  पॅलेस्टिनींचा मृत्यू गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे झाला असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गाझामध्ये इस्त्रायली सैनिकांच्या गोळीबारामध्ये 104 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो सैनिक जखमी झाल्याचा गाझाकडून दावा करण्यात आला आहे. पॅलेस्टिनी रेशन पोहोचवणाऱ्या ट्रकच्या समोर उभे होते. भूकेने बेहाल झालेल्या नागरिकांना ट्रकभोवती गराळा घातला आणि एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, इस्रायली सैन्याने गोळीबार केला. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकांचा ट्रकने चिरडून मृत्यू झाला.त्याच वेळी, संयुक्त राष्ट्र प्रमुख गुटेरेस यांनी गाझा मदत स्थळावरील या दुःखद घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या घटनेत 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, जमाव अन्नाची वाट पाहत असताना इस्रायली सैन्याने कथित गोळीबार केला तेव्हा 100 हून अधिक लोक मारले गेले. गोळीबार का करण्यात आला, याबाबत इस्रायली लष्कर आणि प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे परस्परविरोधी आहेत.