मायबाप सरकार… केलेला खर्चही निघेना हो… केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर शेतकर्‍यांनी मांडल्या व्यथा

जालना जिल्ह्यात बुधवारपासून दुष्काळी पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आले आहे. मात्र, हे पथक रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जावूनच पाहणी करत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या व्यथा कोण ऐकून घेईल आणि त्यांचे नुकसान किती झाले हे कसे कळणार, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. अंबड तालुक्यात गुरुवारी केंद्रीय आतर मंत्रालयीन समितीचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून मूल्यमापन व सनियंत्रण अधिकारी हरीश हुंबर्जे, केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए. एल. वाघमारे यांनी अंबड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

सर्वप्रथम पथकाने मौजे डावरगाव येथे भेट दिली. या भेटीदरम्यान पथकाने सचिन मोहन धुपे, नितीन मोहन तुपे यांचे गट नंबर 108 मधील शेतीची पाहणी केली. तेथे कापूस आणि तूर पेरलेली दिसून आली. शेतकर्‍यांनी सांगितले की, यावर्षी कापसाचा खर्च अर्धा सुद्धा निघालेला नाही. तेथील इतर शेतकर्‍यांशी चर्चा करताना पथकाने विचारले की याव्यतिरिक्त इतर पिकांची काय परिस्थिती आहे. त्यावेळी शेतकर्‍यांनी सांगितले की, खरीप आणि रब्बी कोणतीही पीके आम्हाला घेता आलेले नाही. काही शेतकर्‍यांनी असे नमूद केले की, अंबड तालुक्याचा उत्तर भाग हा दुष्काळग्रस्त असतो. यासाठी एक्सप्रेस कालवा झाला पाहिजे, तशी नोंद सदस्यांनी करून घेतली.

यानंतर पथक वलखेडा येथील गट नंबर 71 मध्ये आले. तेथे गोदावरी सिताराम कान्हे यांच्या कापसाची पाहणी केली. परिसरातील अनेक शेतकरी तेथे उपस्थित होते. त्यावेळीही शेतकर्‍यांनी सांगितले की, आम्हाला सोयाबीनचा तर भुसा सुद्धा हाताला आला नाही. तसेच काही शेतकर्‍यांनी असे नमूद केले की शासन म्हणते की कडधान्य पेरा, परंतु कडधान्यांपासून आम्हाला काहीही उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि यावर्षी शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत शासनाकडून मिळाली पाहिजे. त्यानंतर पथक पांगरखेडा येथील भास्कर अंबादास कोल्हे यांच्या गट नंबर 86 मधील क्षेत्रात गेले. त्या ठिकाणी कापूस आणि आंतरपीक म्हणून तुर हे पीक दिसून आले. या ठिकाणीही शेतकर्‍यांनी व्यथा मांडली आणि शेतीसाठी पाण्याची व्यवस्था शासनामार्फत झाली पाहिजे, अशी मागणी केली.

त्यानंतर पथक खडकेश्वर पाझर तलाव येथे आले. त्या प्रकल्पाचे संबंधित अभियंता उपस्थित होते. त्यांनी माहिती दिली की हा प्रकल्प हा 2005 साली पूर्ण झाला आहे. तथापि यावर्षी प्रकल्पात पाणीच आलेले नाही. त्यामुळे जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. तसेच काही शेतकर्‍यांनी अशी मागणी केली की, धरणक्षेत्रात काही खाजगी शेतकर्‍यांच्या विहिरी आहेत,त्यांचे पाणी बंद करावे,जेणेकरून सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींना पाणी पुरु शकेल. त्यानंतर पथक ताडहदगाव मधील गट नंबर 32 मधील शेतकरी अनिल अशोक दिवटे यांच्या मोसंबीच्या शेतात हजर झाले. या ठिकाणी मोसंबी पिवळी पडलेली दिसून आली आणि यावर्षी भाव अत्यंत कमी असल्याने खर्च सुद्धा निघणार नाही असा टाहो शेतकऱ्यांनी फोडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, कार्यकारी अभियंता विद्या कानडे, जिल्हा कृषीअधीक्षक गहिनीनाथ कापसे, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, पशुसंवर्धन अधिकारी प्रेषित मोघे, उपविभागीय अधिक्षक कृषी अधिकारी राम रोडगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.