भाषण सुरू असताना उमेदवार बसले जमिनीवर, सभेच्या व्यवस्थेवरून जयंत पाटील यांचा पोलिसांना टोला

लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघामधील उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पुणे, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित केलेल्या सभेत तिन्ही उमेदवार भाषणावेळी मंडपासमोर येऊन बसले यावरून जयंत पाटील यांनी पोलिसांना टोला हाणला.

महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. या सभेदरम्यान, तिन्ही उमेदवार व्यासपीठावरून खाली येऊन मंडपासमोर मांडी ठोकून बसले. त्यावरून जयंत पाटील यांनी पोलिसांना टोला हाणला.

‘पोलिसांनी आम्हाला छोट्या जागेची व्यवस्था केली. पदोपदी अन्याय हे आम्हाला सांगणं आवश्यक आहे. कारण, मोठ्या रस्त्यावर जागा दिली असती तर बरं झालं असतं. तीन पक्षाचे कार्यकर्ते येथे आलेले आहेत. पण, इथं बसायला जागा नाही. पोलिसांचा दृष्टीकोन कसा अन्यायकारक आहे, हे तुम्ही सिद्ध केलंय. पण, दिवस बदलत असतात लक्षात ठेवा’ असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.