पाकीटमार कधीतरी पकडला जातोच! जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका

दरोडेखोर मंगळसूत्र पळवून ते बायकोला घालू शकतो. पण, येणारा काळच ठरवेल की कोणतं मंगळसूत्र खरं आहे. पाकीटमार कधीतरी पकडला जातोच, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना आव्हाड म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना पक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत जाण्याच्या पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, हे पत्र शरद पवार यांच्याकडे जाणार होते. मला ही गोष्ट मान्य नव्हती. पण तेव्हा अजित पवार यांच्यासमोर बोलण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्यामुळे मी या पत्रावर सही केली होती. बैठक संपल्यानंतर मी जयंत पाटील यांना गाठून त्या पत्रावरील माझे नाव आणि सही खोडा, असे सांगितले होते. अजित पवार हे तेव्हा शरद पवार यांच्या सावलीत होते. त्यामुळे काय होईल, याची कल्पना नव्हती. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठीच्या पत्रावर सह्या करण्याच्या प्रस्तावाला मी विरोध करु शकलो नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

तसंच, 2019ला अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करणं ही शरद पवार यांची सर्वात मोठी चूक होती. कारण, एकदा गद्दारी करणारी व्यक्ती कायम गद्दारच असते, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे जाण्यावरूनही जितेंद्र आव्हाड यांनी पाकीटमार हा कधीतरी पकडला जातोच, अशी टीका केली.