नड्डांच्या टीमचे लोकसभा निवडणुकीसाठी पुनर्गठन, महाराष्ट्रातल्या तीन नावांचा समावेश

2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आता भाजपने मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर जेपी नड्डा यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये अनेक नव्या चेहेऱ्यांना जागा मिळाली आहे तर काही जुन्या चेहेऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीर केलेल्या या यादीत महाराष्ट्रातील तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. नड्डांच्या या टीममध्ये राष्ट्रीय महामंत्री म्हणून विनोद तावडे तर राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर व पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले आहे.

नड्डा यांच्या नव्या टीममध्ये वसुंधरा राजे, रमण सिंह आणि कैलाश विजयवर्गीय यांच्यासह 38 नेत्यांना स्थान मिळाले आहे. या यादीतील विशेष बाब म्हणजे काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले अनिल अँटनी यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल हे माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचे पुत्र आहेत.

या यादीमधून दोन नेत्यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. कर्नाटकात निवडणुकीत पराभूत झालेल्या सीटी रवी यांची सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आसाममधील भाजप खासदार दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले आहे. यासोबतच हरीश द्विवेदी यांची राष्ट्रीय सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष दिलीप घोष आणि भारतीबेन श्याल यांचा नव्या टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.