लेख – ‘केशव पांडुरंग जोग’ सरांना आठवताना

prof-k-p-jog

>> प्रा. विनया क्षीरसागर(नीलिमा मोने)

26 मार्च 2024, जोग सरांचा शंभरावा जन्मदिन. त्यांच्या जन्मशताब्दीची सुरुवात, केशव पांडुरंग ऊर्फ शांताराम जोग- पुणे विद्यापीकाच्या संस्कृत विभागातील एक विद्यार्थिप्रिय सर. जोग सर जन्माने पुणेकर, त्यांच्या अध्यापनाच्या कारकीर्दीची सुरुवात मुंबईमधून झाली. भाऊ दाजी पारितोषिक आणि सुवर्णपदक, त्याचबरोबर बीए आणि एमए मधे संस्कृतमधील प्रथम क्रमांकाबद्दल दक्षिणा फैलोशिप आणि इतरही अनेक पारितोषिक व शिष्यवृत्ती प्राप्त करून संस्कृत विद्येमधे अधिकाधिक यश आणि नावलौकिक मिळवत जोग सरांच्या कर्तृत्वाची कमान सतत चढतीच राहिली.

मुंबई शहरात खालसा कॉलेज, कीर्ती कॉलेज, सोमैय्या कॉलेज मध्ये त्यांनी संस्कृत आजि त्याचबरोबर अर्धमागधी पण शिकविली. दोन्ही भाषांसाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तकेही मुंबई विद्यापीठात तयार केली.
डिसेंबर 1950 पासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईमध्ये 1965 च्या मेपर्यंत चालू होता, त्यांनंतर पुण्याकडे तो वळला, ते थेट डेक्कन कॉलेजमधून जुलै 1985 मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत! पुण्यामथे त्यांचे संशोधन आणि अध्यापनाचे काम बहरले ते मुख्यतः पुणे विद्यापीठातील संकृत प्रगत अध्ययन केंद्रात रिसर्च असोसिएट, नंतर रीडर अशा पदांवर असताना जोग सरांनी संस्कृतच्या वेगवेगळ्या शाखांचे अध्यापन केले. एमए च्या काही बॅचेसना त्यांनी वेद शिकवला, तर काहींना शाकुंतलसारखे नाटक, काहीनां ब्रह्यसूत्रभाष्य आणि वेदांत इतर ग्रंथ तर त्याच बरोबर साहित्यशास्त्राचा इतिहासदेखील. विविध विषयांमध्ये सहज गती असल्याने प्रत्येक विषय सरांनी सोप्या सोप्या, पण मूलगामी विचार करण्याच्या पद्धतीने उलगडून सांगितला. पीएचडीच्या संशोधनासाठी सरांना प्रा. ह. दा. वेळणकरांचे समर्थ मार्गदर्शन मिळाले. प्रत्येक विषय, प्रत्येक शब्द स्वतः कसा समजून घ्यायचा याच्या पद्धती सरांनी सांगितल्या. शिकवताना त्यांचे दूसरे प्राध्यापक डॉ. रा. पं. कंग्ले, नाट्यशास्त्र आणि अर्थशास्थासारखे संपूर्णतः भिन्न विषय त्यांनी आत्मसात केलेले! तोच वारसा जोग सरांनी पुढे चालू ठेवला. भरताच्या रससिद्धांताचे, अभिनवाचा मागोवा घेत सरांनी केलेले विवरण, साहित्याचे, नाट्याचे मर्म समजून घेण्यासाठी, ‘रस’ ग्रहणासाठी किती उपयोगी पडते हे सांगता येणार नाही!

नॅशन‌ल लेक्चरर म्हणून सरांनी जी व्याख्याने दिली ती अधिक याच विषयाशी निगडित होती. नाटकांच्या टीका, भरताचे नाट्यविषयक सिद्धांत कसे उलगडून दाखवतात आणि नाट्याची खरी नाट्यात्मता कशी ओळखायची यावर सरांनी खूप सांगितले, संशोधन केले आणि आपल्या विद्यार्थ्यांकडूनही करून घेतले! विद्यार्थ्यांकडूनही करून घेतले डेक्कन कॉलेजच्या संस्कृत भाषेच्या प्रोफेसरपदावर गेल्यानंतर वैदिक भाषे भाषेसाठी विशेष करून हे पद असल्याने, वेदांच्या अर्थापनाविषयी अधिकाधिक संशोधन करून अनेक शोधनिबंध सरांनी लिहिले. सहितांमधील पाठभेद, त्यांच्या भाष्यांतील वेगवेगळे पाठ, तसेच त्यांच्याशी निगडित असलेले विधी- आणि त्यांमधील मूळ, संकल्पना यांवरही संशोधन त्यांनी केले आणि करूनही घेतले. कोशनिर्मितीच्या जबाबदारीमध्ये आणि प्रत्यक्ष कामामधे हा साक्षेपीपणा आणि बारीक बारीक तपशिलांवर संपूर्ण विचार करण्याची सवय खूप महत्त्वाचे ठरले. याच सवयी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये न-कळत पण जाणीवपूर्वक बिंबवल्या.
भाषेवरती प्रभुत्व ही सरांची एक जमेची बाजू! महाभारताच्या विराट-पर्वाचे भाषांतर त्यांनी केले, फ्रेंच भाषा त्यांना उत्तम येत होती लुई रनू या प्रसिद्ध फ्रेंच विचारवंतांच्या काही लेखांचे त्यांनी भाषांतरही केले आहे. जर्मन भाषा तर त्यांच्या संशोधनाचे साधन होते. जर्मनीला जाण्यासाठी त्यांना तेथील सरकारची स्कॉलराशप मिळाली होती आणि त्याचे तेथील अध्यापक होते, प्रसिद्ध वेद आणि व्याकरण तज्ज्ञ प्रा. पाउल थिम. पुन्हा याच स्कॉलरशिपवर 1974 साली सर जर्मनीला गेले होते आणि त्यांची वारंवार चर्चा आणि भेटही होत असे. बंगाली भाषेवर सरांचे अतोनात प्रेम होते आणि प्राकृत भाषेचे सौंदर्यही ते हळूवारपणे उलगडून दाखवत. विद्यापीठीय अध्यापनाबरोबर इतरत्रही त्योनी बरंच अध्यापन केलं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी खूप वर्ष अनेक विषय शिकवले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरही त्यांची व्याख्याने झाली.

दुर्गाताई भागवत यांच्याशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. वसंत बापटांसारखे कवी त्यांचे सह-प्राध्यापक होते; तर मंगेश पाड‌गावकर त्यांचे विद्यार्थी-मित्र! आनंद साधले आणि नलिनी साधले त्यांचे जिवलग मित्र होते.

मराठी साहित्य समीक्षेमध्येही सरांनी योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जोगसर त्यांच्या घरी जात असत. विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती, वातावरण समजून घेऊन त्याला चिंतामुक्त, तणावमुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. यातून फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांच्या घरचे लोक ही सरांनी जोडले, नवीन नाती निर्माण केली. त्यांच्या या जनसंपर्काचे इत्तर अनेक अध्यापक कौतुक करत आणि बोलूनही दाखवत. विद्यार्थ्यांशी गप्पा मारत, त्यांना बोलते करत, ‘ऐसपैस’ पध्दतीनं शिकवताना सरांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तयार केलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या बरोबर कामही केलं आणि त्यांना नावारूपाल आणलं! एखाद्या अध्यापकाची ज्ञानाची पुढची पिढी, त्याचं दुसरं रूप म्हणजे त्याचे असे हे विद्यार्थी! त्यांच्या ज्ञानाच्या देणगीचे ते मूर्तिमान रूप असतात, त्या शिक्षकांचंही! शरीराने जोग सर आज नाहीत पण त्यांचं ‘असं’ नाव सांगणारे विद्यार्थी आज आहेत, कृतार्थ आहेत आणि त्यांना आदरपूर्वक वंदन करीत आहेत!