खालापूरच्या इर्शाळवाडीवर मृत्यूची दरड कोसळली! 16 ठार, 21 जखमी

>> अरुण नलावडे / समाधान दिसले 

गाढ झोपेत असताना खालापूरच्या इर्शाळवाडीवासीयांवर बुधवारी रात्री मृत्यूची दरड कोसळली. पावसाच्या तुफान माऱयाने महाकाय दरडी आणि चिखलमातीचा डोंगर वाडीवर कोसळून 25 हून अधिक घरे गाडली गेली. या दुर्घटनेत 16 जण जागीच ठार झाले तर 21 जण जखमी झाले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. आक्रोश, किंकाळ्या आणि हंबरडय़ाने काळजाचा थरकाप उडाला. उंचावर असलेल्या आणि केवळ एकच पायवाट असलेल्या या आदिवासी वाडीवर मनुष्यबळ वगळता कोणतीही यंत्रणा पोहचू शकत नसल्याने एनडीआरएफ, टीडीआरएफने सुरू केलेल्या बचावकार्यात प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, 106 जण बचावले असून अजूनही 120 गावकरी ढिगाऱयाखाली दबल्याची भीती आहे.

खालापूर तालुक्यातील चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरील पट्टय़ात इर्शाळगड ही आदिवासी वाडी आहे. इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या या वाडीचे नाव इर्शाळगडावरूनच इर्शाळवाडी असे पडले. या वाडीत सर्व 48 घरे ही आदिवासी ठाकूर समाजाची असून 228 इतकी लोकसंख्या आहे. मोलमजुरी आणि मासेमारी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास सर्व कुटुंबे झोपेत असतानाच या वस्तीवर डोंगर कोसळला.

आज पुन्हा बचावकार्य सुरू करणार

दिवसभर प्रचंड पाऊस असतानाही एनडीआरएफ पथक आणि अन्य संस्थांच्या टीमचे बचाव कार्य सुरू होते. मात्र सायंकाळी साडेसहा नंतर पावसाचा जोर वाढला आणि काळोखही पडू लागला. त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले. उद्या शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफ टीमच्या प्रमुखांनी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख

मृतांच्या नातेवाईकांना सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार करणार आहे.

दीड तास पायपीट करून मुख्यमंत्री इर्शाळवाडीत पोहोचले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी सात वाजताच इर्शाळ गडाच्या पायथ्याशी नानेवाडीला पोहोचले. तेथून त्यांनी सर्व यंत्रणांशी संपर्क साधून बचावकार्याला वेग दिला. त्यांनी एअर पर्ह्सची हेलिकॉप्टर पाठवण्याच्या सूचना केल्या. परंतु खराब हवामान आणि मुसळधार पाऊस हेलिकॉप्टरचे उड्डाणच झाले नाही. दुपारनंतर मुख्यमंत्री शिंदे हे दीड तासांची पायपीट करत इर्शाळवाडीला गेले. तेथे त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

एनडीआरएफ, टीडीआरएफ जवानांची शर्थ
एकच पायवाट, त्यात प्रचंड पावसाचा मारा, धुके व चिखल अशा परिस्थितीला तोंड देत एनडीआरएफच्या चार टीम म्हणजेच एकूण 100 जवान आणि टीडीआरएफचे 80 जवान दीड तासांची पायपीट करत घटनास्थळी पोहोचले. जेसीबी, पोकलेन अशी कोणतीही यंत्रणा वर नेणे शक्यच नसल्याने त्यांनी कुदळ फावडय़ांनी दरडी आणि मातीचा डोंगर उकरून काढत बचावकार्य केले.

आजही शाळांना सुट्टी
अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन उद्या रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत मात्र शाळा सुरू राहणार आहेत.

कोकणात पावसाने हाहाकार माजवला असतानाच माळीण आणि तळियेसारखी काळीज गोठवून टाकणारी भयंकर दुर्घटना इर्शाळवाडीत घडली. अनेकांचे संसार या दरडींखाली गाडले गेले.

माझा मुलगा आणि नातवंडे दबली हो…
माझा मुलगा आणि नातवंडं ढिगाऱयाखाली दबली हो… असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश या आजीबाईंनी केला. मी बाहेर झोपली होते म्हणून कसाबसा जीव घेऊन पळाले. पण माझे घर आणि माझी माणसं ढिगाऱयाखाली दबली जाताना मी उघडय़ा डोळ्यांनी पाहिली. माझा मुलगा, सून, नातवंडं आणि नणंद हे सगळे ढिगाऱयाखाली दबले आहेत… त्यांना वाचवा हो… असे सांगताना त्या आजीबाईंच्या अश्रूंना खंड नव्हता.

अग्निशमन जवानाचा मृत्यू
इर्शाळवाडीवर मदतकार्यासाठी पोहोचलेले नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन पथकातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. ढुमणे यांना इतर सहकाऱयांनी उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी हालचाली सुरू केल्या, मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईला ऑरेंज ठाणे रायगडला रेड अलर्ट

मुंबई, ठाणे, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात गेले 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेकांची ‘दैना’वस्था करणारा पाऊस आजही दिवसभर कोसळत होता. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईसाठी उद्या ‘ऑरेंज’ अलर्ट तर ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्यासाठी ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मदतकार्यासाठी मुंबई पालिका धावली
इर्शाळवाडी दुर्घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी मुंबई पालिका धावली. मदत कार्यासाठी एकूण तीन बॉब पॅट संयंत्र घन कचरा व्यवस्थापन विभागाद्वारे रवाना झाले आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक वाहन रवाना झाले. तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे. पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार ही आवश्यक साधनसामग्री पाठवण्यात आली आहे.

गाडगीळ समितीने दिला होता इशारा
राज्यात भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. डोंगर पोखरून काढले जात असून मानवी हस्तक्षेप थांबला पाहिजे, अशी शिफारस करतानाच दरडींबद्दलही गाडगीळ समितीच्या अहवालातून इशारा दिला होता. परंतु हा अहवालच केंद्रीय पर्यावरण खात्याने वेबसाईटवरून काढल्याचा आरोप जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांनी केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारलाही लोकांच्या जिवाचे काहीच पडलेले नसल्याचेच उघड झाले आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे मदतकार्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी सात वाजता इर्शाळवाडीच्या पायथ्याशी पोहोचले. त्याआधी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास गिरीश महाजन, आमदार महेश बालदी हे पोहोचले होते. त्यांनी चालत घटनास्थळ गाठले. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, आदिती तटकरे यांनीही जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत मदतकार्य सुरू केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसेचे बाळा नांदगावकरही घटनास्थळी पोहचले.

मुख्यमंत्री आले म्हणून त्यांच्या मागे जाऊ नका; अजितदादांनी अधिकाऱयांना खडसावले
दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री आल्याचे कळताच मदतकार्य सोडून संबंधित अधिकारी गडाच्या खाली उतरले. हे पाहून मंत्रालय नियंत्रण कक्षातून इर्शाळवाडी येथील स्थितीचा आढावा घेणाऱया अजित पवारांचा पारा चढला अन् त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांना फोन लावत संबंधित अधिकाऱयांना दम भरला. मुख्यमंत्री आलेत म्हणून त्यांच्या मागे खाली जाऊ नका. गडाच्या पायथ्याशी जायला एक-दीड तास, परत वर यायला एक-दीड तास. यातच 3 तास गेले तर मदतकार्य कसं होणार, असे म्हणत अजित पवार यांनी अधिकाऱयांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.