‘पट्टा’- शिवाजी महाराजांचे दुधारी शस्त्र!

>> किरण सुभाष शिंदे

मराठय़ांच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी पट्टा या शस्त्राची नाळ जोडली गेलेली आहे. पट्टा हे दुधारी शस्त्र असून मुठीपासून ते कोपऱयापर्यंत हाताचे संरक्षण व्हावे यासाठी खोबळा किंवा दस्तानाची संरक्षण व्यवस्था असते. युद्धशास्त्रामध्ये योद्धय़ाच्या हाताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने केलेली उपाययोजना ही या शस्त्राची खासीयतच म्हणावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्टय़ाचे नाव ‘यशवंत’ असल्याचे ‘चित्रगुप्ताच्या बखरी’तून संदर्भ मिळतात.

इतिहास हा मुळात सर्वसामान्यांसाठी नावडता विषय ! मात्र या नावडत्या विषयात जेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव यायला लागतं तेव्हा हा विषय सर्वांना हवाहवासा वाटू लागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच रक्त सळसळतं. एवढी विलक्षण शक्ती आणि ताकद या नावामध्ये आहे. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्राला फार मोठी शौर्य परंपरा लाभलेली आहे आणि या शौर्य परंपरेचा मानबिंदू आणि सर्वोच्च स्थान छत्रपती शिवरायांचे असल्याने त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचा अभ्यास आजही केला जातो. असाच त्यांच्या जीवनातील ‘पट्टा’ हा शस्त्ररूपी पैलू आपण अभ्यासणार आहोत. वि. का. राजवाडेंसारखे मराठेशाहीच्या इतिहासाचे थोर संशोधक ‘शस्त्र’ हे राष्ट्राच्या एपंदरीत संस्कृतीचे मापक असल्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक विधान करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पट्टय़ाचे नाव ‘यशवंत’ असल्याचे ‘चित्रगुप्ताच्या बखरी’तून संदर्भ मिळतात. शिवाजी महाराज सुरतेची लूट घेऊन कांचन-मांचनचा घाट ओलांडून नाशिककडे जाताना मोगलांचा सरदार दाऊद खान याने छत्रपतींना अडविले असता 16 ऑक्टोबर 1670 रोजी वणी – दिंडोरी येथे मोगली सैन्यासोबत मराठय़ांचे युद्ध झाले. या मोहिमेचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासदाला ‘राजा खासा घोडय़ावर बसून बख्तर घुगी घालून, हाती पट्टे चढवून, पाईचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हजार स्वारानिशी सडे सडे राऊत उभे राहिले’ असे शिवछत्रपतींचे वर्णन करावेसे वाटले. याचा अर्थ स्पष्ट होता की, युद्धाचे नेतृत्व खुद्द छत्रपती शिवराय करत असून त्यांच्या दोन्ही हातांमध्ये ‘पट्टा’ ही शस्त्र त्यांनी धारण केलेली होती.

छत्रपती शिवरायांना बालवयात जे ज्ञान, संस्कार व प्रशिक्षण देण्यात आले, त्यामध्ये इतर शस्त्रांच्या प्रशिक्षणाखेरीज पट्टा शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा कवींद्र परमानंद ‘शिवभारत’ अध्याय 10, श्लोक क्र. 37 मध्ये उल्लेख करतात. त्यानंतर प्रतापगडावर घडलेले अफझलखान प्रकरण अभ्यासल्यास या युद्धाप्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘पट्टा’ शस्त्र व तलवार यांच्या सहाय्याने जणू एक अभेद्य तट (श्लोक क्र.62) तसेच तलवार व ‘पट्टा’ शस्त्र फिरवून आपल्या भोवती संरक्षक वलय (श्लोक क्र.64) निर्माण केल्याचे वर्णन कवींद्र याच ग्रंथात करतात.

नेदरलँड, लंडन, फ्रान्स, जर्मनी, रशिया देशांमधील संग्रहालयांमध्ये आज जी छत्रपती शिवरायांची समकालीन चित्रे जतन करण्यात आलेली आहेत, त्या चित्रांमध्ये छत्रपती शिवरायांच्या हातातील ‘पट्टा’ आपलं लक्ष लगेच वेधून घेतो. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रातदेखील त्यांच्या हातात ‘पट्टा’ शस्त्र असल्याचे दाखविले आहे. इतिहास अभ्यासक द.बा. पारसनीस यांच्या संग्रहातून हे चित्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळाले होते. याचाच अर्थ स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींच्या दिमतीला ’पट्टा’ हे शस्त्र कायम असायचे हे सिद्ध होते. रघुनाथ नारायण हणमंते तथा धुंडीराज व्यासलिखित ‘राजव्यवहारकोश’, जयराम पिंडयेलिखित ‘पर्णालपर्वत ग्रहणाख्यान’, शंभू छत्रपतीलिखित ‘श्रीबुधभूषण’ यांसारख्या शिवकालीन इतिहासाची माहिती देणाऱया अस्सल साधनांमधूनदेखील ‘पट्टा’ या शस्त्राचे संदर्भ मिळतात.

शाहीर तुळशीदास हा छत्रपती शिवरायांचा समकालीन शाहीर. त्यांनी ’सिंहगडाच्या युद्धावर तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर जो पोवाडा रचला आहे, त्यात नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे ‘पट्टा’ शस्त्राने युद्ध लढण्यात इतके निपुण होते की, त्यांनी स्वतः पट्टा शस्त्र चालविण्यास सुरुवात केल्यास ते पन्नास ‘पट्टेकरां’च्या बरोबरीचे असल्याचे वर्णन पोवाडय़ात मिळते.

आज शिवकाळाला जवळ जवळ 350 वर्षे लोटून गेली आहेत, तरीही राजपूत, शीख युद्धकला तसेच हिमाचल – ठोडा, बिहार – परिखंडा, तामीळनाडू – सिलंबम, ओडिसा – पैका खेडा, केरळ – कलारी पायाटू यांपैकी केवळ आपल्या महाराष्ट्रानेच ‘पट्टा’ चालविण्याची मर्दानी युद्धकला ’दांडपट्टय़ाच्या खेळाच्या रूपाने आज जपली आहे. आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक शस्त्र अभ्यासक जॉर्ज केमरॉन स्टोन, लॉर्ड इगर्टन, थॉमस हॅण्डले, पी.एस. रॉसन, रवींद्र रेड्डी आणि भारतीय परंपरेचे शस्त्र अभ्यासक गायत्री नाथ पंत तसेच दत्तात्रय चिंतामण मुजुमदार (बडोदे), डॉक्टर मधुकर जाधव यांसारखे भारतीय शस्त्र अभ्यासक ‘पट्टा’ हे मराठा शस्त्र असल्याचे आपल्या संशोधनात लिहितात.

शिवाजी महाराजांच्या अंगी असलेली वीर वृत्ती, शौर्य, नेतृत्व,संघटन कौशल्य, राजनीती, कुशाग्र बुद्धिमत्ता, दूरदृर्ष्टी, कुशल सेनानी यांसारख्या गुणांनी शिवाजी महाराजांचे चरित्र भरलेले असल्यामुळे एक अलौकिक पुरुष तसेच एक दैवी अवतार म्हणूनच आजही शिवराय नावाचे गारुड जनसामान्यांच्या मनावर आहे. म्हणूनच छत्रपती ‘शिवराय’ नामक अलौकिक प्रतिभेच्या महापुरुषाच्या आणि मराठा योद्धय़ांच्या, मावळ्यांच्या, वीरांच्या, जीवन चरित्रातील ‘पट्टा’ नामक शस्त्ररूपातील पैलू महाराष्ट्राच्या चिरंतन स्मृतीत राहावा यासाठीच इतिहासाचे विद्यार्थी या नात्याने आम्ही पाठपुरावा केला आणि आज ‘पट्टा’ हे महाराष्ट्राचे राज्यशस्त्र बनले आहे.

[email protected]
(लेखक ऐतिहासिक शस्त्र संग्राहक आणि अभ्यासक आहेत)