छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा ठराव प्रलंबितच, कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनलचे लोकार्पण

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी उजळाईवाडी येथे सुरू केलेल्या विमानतळावर युद्धपातळीवर साकारण्यात आलेल्या टर्मिनलचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. मात्र, या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने केलेला ठराव केंद्र सरकारकडे गेली आठ-दहा वर्षे प्रलंबितच असल्याचे दिसून आले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विमानतळावर उपस्थित असताना त्यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ घाईघाईत दिखाव्यासाठीच टर्मिनलचे लोकार्पण केल्याची चर्चा होऊ लागली आहे.

कोल्हापूर विमानतळाची स्थापना छत्रपती राजाराम महाराजांनी सन 1939मध्ये केली होती. आज लोकर्पण केलेल्या नूतन इमारतीतून कोल्हापूर जिह्याची संस्कृती आणि वारसा दृश्य स्वरूपात प्रवाशांना पाहता येणार आहे. विमानतळावर रात्रीची हवाईसेवा सुरू केल्याने प्रवासी वाहतूक वाढली आहे. या टर्मिनल इमारतीची प्रवासी हाताळणी क्षमता 150 प्रवाशांपर्यंत होती. त्यानुसार भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन एटीसी टॉवर-कम-टेक्निकल ब्लॉक आणि एअरसाइड वाढीसह नवीन टर्मिनल बिल्डिंगचे नियोजन करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 255 कोटी खर्चून ए-320 प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्प्यांत धावपट्टी आणि संबंधित कामांच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून 65 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागेत पहिला टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली आहेत.

नवीन टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 3900 चौ.मी. असून, ताशी प्रवासीक्षमता 500 आहे. वार्षिक क्षमता पाच लाख प्रवासी आहे. वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी, पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगारनिर्मितीला चालना देऊन कोल्हापूरच्या आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील हस्तकला उद्योगाच्या वाढीस मदत होणार आहे.