lok sabha election 2024 : लोकसभा निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी; टीएमसीचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओ ब्रायन यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी केली आहे. कारण भाजपचे डावपेच हे निवडणूक आयोगासारख्या संस्था उद्ध्वस्त करणारे आहेत, अशी जहरी टिकाही डेरेक ओ ब्रायन यांनी भाजपवर केली आहे.

राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपला लोकांसमोर जाण्याची भीती का वाटतेय? असा सवालही त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत  केला आहे. ‘भाजपचे घाणेरडे डावपेच  निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थाना नष्ट करत आहेत. भाजप जनतेचा सामना करण्यास एवढे घाबरत आहे की, विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी निवडणूक आयोगाचे रुपांतर पक्ष कार्यालयात करत आहे. ECI की HMV (हिज मास्टर्स व्हॉइस)?” “निवडून आलेल्या राज्य सरकारांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.  स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या नावाखाली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली 2024 ची निवडणूक व्हावी”, असे डेरेक ओ ब्रायन यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांना हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विवेक सहाय यांची नियुक्ती अनिवार्य केली. ज्यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले होते, त्यांना राज्याचे नवे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्त केले. यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला. भाजप घटनात्मक संस्था नियंत्रित करत असल्याचा आरोप टीएमसीने केला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसी आणि विरोधी भाजप यांच्यात राजकीय द्वंद्व सुरू झाले आहे.