जम्मू-कश्मीरच्या नौशेरात भूसुरुंग स्फोट; एक जवान शहीद, दोन जखमी

जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोटात हिंदुस्थानी लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर अन्य दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी साडेदहाच्या सुमारास 17व्या लाईट बटालियनच्या देखरेख क्षेत्रात फॉरवर्ड डिफेन्स लाईनपासून सुमारे 300 मीटर अंतरावर घडली.

स्फोट झाला त्या वेळी लष्कराचे जवान नियंत्रण रेषेजवळ नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. स्फोटानंतर जवानांना तातडीने हवाई मार्गे उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जखमींपैकी एक जवान शहीद झाला असून अन्य दोन गंभीर जखमी झाले आहेत. नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यासाठी लपून बसलेले दहशतवादी हे भूसुरुंग पेरून ठेवतात. यामुळे यासारख्या भूसुरुंगाचा घटना घडत असतात.