धारावीकरांच्या विरोधाच्या धास्तीने अदानीची पत्रकबाजी

स्थानिकांचा विरोध डावलून धारावीत सोमवार, 18 मार्चपासून सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी धारावीकरांचा सर्वेक्षणाला होणारा विरोध लक्षात घेता ‘डीआरपीपीएल’ अर्थात धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे धारावीत घरोघरी पत्रक वाटण्यात येत आहेत. या पत्रकाद्वारे सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन रहिवाशांना करण्यात येत आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास अदानी समूहामार्फत करण्यात येणार आहे. धारावीतील रहिवाशांकडून माहिती गोळा करण्यासाठी 18 मार्चपासून माटुंगा पूर्व येथील कमला रमण नगर येथून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. दोन टप्प्यांत सर्वेक्षणाची प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक झोपडीला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित गल्लीचे लेसर मॅपिंग करण्यात येईल. ज्याला ‘लिडार सर्व्हे’ म्हटले जाते.
दुसऱया टप्प्यात रहिवाशांचा बायोमेट्रिक डेटा गोळा करण्यात येणार असून त्यांची कागदपत्रे विशिष्ट अॅपच्या सहाय्याने अपलोड केली जातील. प्रत्येक झोपडीचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करण्यात येणार आहे. साधारण एका रहिवाशाच्या सर्वेक्षणासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागणार आहे.

पत्रकात काय…

z अदानी समूहातर्फे विविध भाषांमध्ये धारावीत घरोघरी पत्रक वाटण्यात येत आहे. सर्वेक्षणाची प्रक्रिया जाणून त्यात सहभाग घ्या, असे आवाहन या पत्रकात सुरुवातीला करण्यात आले आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाची का आवश्यकता आहे, सर्वेक्षणाची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडेल, सर्वेक्षणावेळी रहिवाशांनी किंवा व्यावसायिकांनी कोणती कागदपत्रे सोबत बाळगावीत याबाबतदेखील पत्रकात माहिती आहे.
z धारावीत सर्वेक्षणासाठी जाणाऱया टीमला खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील काही कर्मचाऱयांना एसआरए सर्वेक्षणाचा अनुभव आहे तर काही फ्रेशर्स आहेत. महिला कर्मचाऱयांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात आहे. रहिवाशांसोबत संवाद साधण्यासाठी शक्यतो मराठी किंवा हिंदी भाषेचाच वापर करा, रहिवाशांना कोणतेही आक्षेपार्ह प्रश्न विचारू नका अशा प्रकारच्या सूचना सर्वेक्षणासाठी जाणाऱया टीमला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.