लवकरात लवकर घर सोडा; जम्मू-कश्मीरमध्ये हिंदू, शिखांच्या घराबाहेर लागले धमकीचे पोस्टर

जम्मू-कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात हिंदू आणि शीख कुटुंबांना घर सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंदू आणि शिखांच्या घराबाहेर उर्दूमध्ये पोस्टर चिटकवण्यात आली असून लवकरात लवकर राहते घर सोडा अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी यात देण्यात आली आहे. त्यामुळे 90च्या दशकात झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या आठवणीने नागरिकांना कापरे भरले आहे. नागरिकांनी पोलीस आणि लष्कराकडे याची तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

पूंछ जिल्ह्यातील दिगवार भाग पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घराच्या बाहेर अज्ञातांनी लावलेल्या पोस्टरमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ही पोस्टर उर्दूमध्ये लिहिण्यात आली आहेत. सर्व हिंदू आणि सरदार बिरादरी (शीख) लवकरात लवकर हा भाग सोडण्याचा इशारा देण्यात येतोय. अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असे या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, याची माहिती मिळताच पूंढ पोलीस स्थानकाचे एसएसओ दीपक पठानिया सुरक्षा दलाच्या जवानांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराबाहेर लावलेले धमकीचे पोस्टर जप्त केले आहेत. यातील एक पोस्टर अॅड. महिंदर पियासा यांच्या ‘गीता भवन’या बंगल्याबाहेरही लावण्यात आले होते. तर दुसरे पोस्टर सुजान सिंह यांच्या लॉनमधून जप्त करण्यात आले.

पीएएफएफने दिलेली धमकी

याआधी एप्रिल महिन्यात पीपुल्स अँटी फासिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या दहशतवादी संघटनेने जम्मू-कश्मीर आणि दिल्लीमध्ये मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. कलम 370 हटवल्यापासून ही संघटना आक्रमक झाली असून वारंवार दहशतवादी कृत्य करत आहे.