LIC Loss – एका दिवसात अदानी समूहाचे 1400 कोटी स्वाहा, अदानी समूहातील समभागांच्या किंमतीत मोठी घसरण

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट्सने (ओसीआरपी) प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे अदानी समूहाला हादरा बसला आहे. OCCRP ने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गडबड केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी हा अहवाल जगजाहीर होताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आणि काही वेळातच हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. या पडझडीच्या काळात भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण या विमा कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली असून त्यांच्या अदानी समूहाच्या समभागांमध्ये घसरण होताच त्याचा एलआयसीला देखील फटका बसला आहे.

अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग घसरले

NSE वर अदानी एंटरप्रायझेसचे समभाग ३.५१ टक्क्यांनी कमी होत बंद झाले. अदानी टोटल गॅसचे समभाग 2.24 टक्क्यांनी घसरून बंद झाले. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअरची किंमत 3.53 टक्क्यांनी घसरली. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 3.76 टक्क्यांनी घसरून बंद झाला. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिकचे समभाग ३.१८ टक्क्यांनी घसरले. 31 ऑगस्ट रोजी अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्समध्ये पुढीलप्रमाणे घसरण पाहायला मिळाली. ACC शेअर्स-0.73 टक्के, अंबुजा सिमेंट्स- 3.66 टक्के, NDTV- 1.92 टक्के, अदानी पॉवर- 1.93 टक्के आणि अदानी विल्मार 2.70- टक्के.

अदानी समूहाला गुरुवारी 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले असा अंदाज आहे. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत अदानी समूहातील 10 कंपन्यांच्या समभागांचे एकूण बाजार भांडवल सुमारे 10.84 लाख कोटी रुपये होते जे 31 ऑगस्ट रोजी ते 10.49 लाख कोटींवर आले होते. म्हणजेच अदानी समूहाला एका दिवसात अंदाजे 35,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) अवघ्या एका सत्रात 1,439.8 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एलआयसीने अदानी समूहाच्या सहा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार, 30 जूनपर्यंत, LIC ची अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिकमध्ये 9.12 टक्के, अदानी एंटरप्रायझेसमध्ये 4.26 टक्के, अदानी टोटल गॅस, ACC आणि अंबुजा सिमेंट्समध्ये 6 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक होती.

अदानी समूहावर दुसऱ्यांदा आरोप

आठ महिन्यांत अदानी समूहावर आर्थिक गडबड आणि समभागांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होण्याची ही दुसरी वेळ आहे. OCCRP पूर्वी, या वर्षी जानेवारी महिन्यात, हिंडेनबर्गने रिसर्चने अदानी समूहावर स्टॉकच्या किमतींमध्ये फेरफार आणि आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र, अदानी समूहाने तो फेटाळला होता. अदानी समूहाने OCCRP चे आरोपही फेटाळून लावले आहेत. OCCRP ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अदानी समूहाने गुपचूपपणे आपलेच समभाग खरेदी करून लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.