लगीनघाईआधी बोटाला शाई; मुंडावळ्या बांधलेला नवरदेव थेट मतदान केंद्रावर दाखल

>> प्रसाद नायगावकर

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा प्रसंग असतो. त्याहून महत्त्वाचे असते ते राष्ट्रीय कर्तव्य. हेच लक्षात ठेवत यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारंसघातील लाठी गावातील नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचे कर्जव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाला आणि आपला हक्क बजावला.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 जागांवर मतदान सुरू आहे. नागपूर, रामटेक, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे मतदान केंद्राबाहेर सकाळपासून तरुण, वयोवृद्ध, महिलांची गर्दी पहायला मिळतेय. यात दिव्यांग नागरिकही मागे नसून तेही आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. अशातच वणी मतदारसंघातील लाठी गावातील एक नवरदेव मतदार केंद्रावर दाखल झाला आणि त्याने सर्वांचे लक्ष वेधले.

अंगात शेरवानी, डोक्यावर पगडी, डोळ्यावर गॉगल आणि कपाळावर मुंडावळ्या अशा वेशातील नवरदेव मतदान केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडेच वळल्या. राहुल खिरटकर असे तरूणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर आला, अन् तेथे त्याने मतदानाचा हक्क बजावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

लोकशाहीसाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केले, असे राहुलने यावेळी सांगितले. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्याने नागरिकांना केले. नवरदेवाचा हा उत्साह पाहून लोकं त्याचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, चंद्रपूर लोकसभेत माहविकास आघाडीच्या प्रतिभाताई धानोरकर विरुद्ध महायुतीचे सुधीर मुनगंटीवार अशी लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी सकाळीच रांगेत उभे राहून मतदान केले.

Lok Sabha Election 2024 Live Update : महाराष्ट्रात 1 वाजेपर्यंत 32.36 टक्के मतदान