Lok Sabha Election 2024 : 238 वेळा पराभव होऊनही ‘हा’ पठ्ठा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

तामिळनाडूतील एक उमेदवार सध्या चर्चेत आहेत. या उमेदवाराने दोन तीन नव्हे तर तब्बल 238 वेळा पराभव होऊनही पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या पराभवाची दखल ‘लिम्का बुक ऑफ इंडिया’ने घेतली असून ‘वर्ल्ड बिगेस्ट इलेक्शन लूझर’ अशी उपाधीही मिळाली आहे. हा उमेदवार म्हणजे तामिळनाडूचे के. पद्मराजन.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच सगळीकडे उमेदवारांची नावे जाहीर होत असताना तामिळनाडूच्या K Padmarajan या उमेदवाराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मेट्टूर येथे राहणारे पद्मराजन यावेळी निवडणूक लढणार आहेत. पद्मराजन टायर रिपेअरच्या दुकानाचे मालक आहेत. ते 1988 पासून निवडणूक लढत आहेत. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत ते धर्मपूरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. ‘इलेक्शन किंग’ अशी ओळख असलेले पद्मराजन हे राष्ट्रपतीपदाची निवडणूकही लढले आहेत. पहिल्यांदा ते निवडणूक लढलो त्यावेळी लोक आपल्यावर हसले. मात्र, लोकांना दाखवू इच्छित होते की, सामान्य माणूसही निवडणूक लढू शकतो. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा  प्रत्येक उमेदावर जिंकण्यासाठी आपला कस पणाला लावतो. पण मला पराभूत व्हायला आवडतं. मला जिंकण्याची आशा नाही, असे पद्मराजन सांगतात.

पद्मराजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाचपेयी, मनमोहन सिंह यांच्या शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधातही ते निवडणूक लढले आहेत. माझ्यासमोर कोणता उमेदवार आहे? याबाबत मी बेफिकिर असतो. मला माझ्या पराभवाचा कित्ता पुढे न्यायचा आहे. मागच्या तीन दशकांपासून त्यांनी एक कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सुरक्षा रकमेचाही समावेश आहे. सुरक्षा रक्कम जप्त केल्यास ही रक्कम परत केली जात नाही. पद्मराजन यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे. ते हिंदुस्थानातील सगळ्यात अयशस्वी उमेदवार आहेत. 2011 च्या निवडणुकीत त्यांना मेट्टूरमध्ये 6 हजार 273 मतं मिळाली होती. या ठिकाणावरून विजयी झालेल्या उमेदावाराला 75 हजारांहून अधिक मतं मिळाली होती. पण त्यावेळी त्यांना एकाही मताची आशा नसताना 6 हजार 273 लोकांनी विश्वास दाखवला होता, असेही ते म्हणाले.