शरद पवारांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही; सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना टोला

supriya-sule

लोकसभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय वातावरण तापत असतानाच उन्हाचा तापही वाढत आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होत आहे. राज्यातील या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. बारामतीसह राज्याच्या अनेक भागात पाणी दुष्काळ असे गंभीर प्रश्न आहेत. माझ्यासाठी दुष्काळी परिस्थिती हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. सरकारने इतर वाऱ्या बंद करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

राज्यात आणि देशात विरोधकांवर तपास यंत्रणांकडून सूडबुद्धाने कारवाई करण्यात येत आहे. याआधी राजकारणात असे झालेले नाही. शरद पवारांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. त्यामुळे लोक पक्षात येत असतील, त्यांचे स्वागत आहे, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला. व्यापारी मेळाव्यासाठी धमक्या दिल्याची बातमी आपण पाहिली. लोकशाहीत धमकीचे प्रकार कोणी करू नये, असा टोलाही सुळे यांनी लगावला.

महा विकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जागावाटपाचे आमच्याकडे काही सिक्रेट नाही. उद्या जागावाटप जाहीर होईल. संध्याकाळी महाविकास आघाडीची एक बैठक होईल यातून वंचित आघाडीबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही सुळे यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी सर्व 48 जागा लढवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.